एकरुखे: राजकारणात कुठेतरी श्रद्धा असावी लागते. मात्र येथील खासदाराची कोणावरच श्रद्धा नाही. हे भाऊसाहेब नाहीत, खाऊसाहेब आहेत. जिथे जाऊ, तिथे खाऊ ही त्यांची प्रवृत्ती. मात्र अनेक आले अन् गेले, यालाही येणाऱ्या निवडणुकीत शिर्डीचा माझा शिवसैनिक गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिर्डीचा पुढचा खासदार हा मला आपलाच हवा, त्यासाठी तीन वर्षे आहेत, शांत बसू नका, कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. मराठवाड्यानंतर काल शिर्डीत येऊन ठाकरेंनी वाकचौरेंचा समाचार घेतला. यावेळी खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, जिल्हाप्रमुख सचिन कोते आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, शिर्डीच्या भाऊसाहेबांना 2009 ला पहिल्यांदा आपण निवडून आणले, खासदार केले, मात्र त्यानंतर 2014 लाही तो पळाला होता. मात्र, योग चांगले असल्याने त्यावेळी आपले सरकार आले होते. हे जिथे जातात ते सरकार पडते. ते काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळी त्यांचेही सरकार पडले होते, आता शहांकडे गेले, कदाचित ते सरकारही पडेल आणि आपले सरकार येईल, असा चिमटाही त्यांनी काढला. कुठेतरी श्रद्धा आणि सबुरी असावी लागते. वाकचौरे थांबले असते तर कदाचित उद्या सरकार आपले आलेही असते. मात्र, त्यांनी गद्दारी केली. जे होते ते चांगल्यासाठीच होते. उद्या आपलेही चांगले दिवस येणार आहेत. त्यावेळी अशी भ्रष्ट आणि गद्दार लोकं आपल्यासोबत नकोच, अशीही टीकाही त्यांनी केली.
माझ्याकडे श्रद्धा आहे, श्रद्धेच्या फळाची वाट पाहण्यासाठी सबुरी आहे आणि यामधे जो आडवा येईल, त्याला तुडवण्याची ताकद दिली आहे, हाच विश्वास घेऊन पुढे चला. साईबाबांच्या मनात असेही असेल हे सरकार पडून आपले सरकार येईल. जोपर्यंत आपला खासदार निवडून येत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही. ज्या गद्दाराला मशालीवर निवडून आणले, त्याला आता त्याच मशालीची धग दाखवून द्या, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
शिवसेना केवळ आमदार आणि खासदारकीसाठी जन्माला आलेली नाही, ती गोरगरीब कष्टकरी माणसांसाठी जन्माला आली आहे. आम्ही साईबाबांच्या चरणी लीन होतो, ते दिल्लीश्वराच्या चरणी नतमस्तक होतात, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
‘भ्रष्ट राजवटीचे संकट दूर करा’
देशावर आणि राज्यावर हे भ्रष्ट राजवटीचे मोठे संकट असून, ते लवकर दूर कर, अशी प्रार्थना आपण साईचरणी केल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, देवेंद्र फडणवीसांचा पत्ता लवकरच कापला जाणार आहे, त्यांच्या खुर्चीचे रक्षण कर, असेही आपण साईबाबांना म्हणालो, असे ठाकरे आवर्जून म्हणाले.
रस्त्यात दिसला की तुडवा: संजय राऊत
इकडचा गद्दार हा एक नंबरचा बदमाश माणूस होता. एकदा गद्दारी केली, त्याला शिवैसिनकांनी रस्त्यावर तुडवला होता. त्यानंतर तो परत आला, उद्धव ठाकरेंची, शिर्डीकरांची माफी मागीतली. त्याला आपण जवळ घेतला. मात्र, त्याने आता पुन्हा गद्दारी केली. तो 100 कोटींना विकला गेल्याचा आरोप खासदार संज़य राऊत यांनी केला.
चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना विचारणा केली होती, तुमच्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत, त्या खऱ्या आहेत का, त्यावेळी वाकचौरे संतापून उठले आणि साईबाबांची शपथ घेऊन माझ्यावर संशय घेऊ नका. मरेपर्यंत तुमच्याबरोबरच राहीन, असा शब्द दिला होता. त्यांना काय कमी केले होते, मान दिला, सन्मान दिला, तरीही अखेर गद्दारी केलीच. आता इकडच्या शिवसैनिकांनी एक मोहीम हाती घेतली असून, ते गावात गावात झोळ्या घेऊन फिरत आहेत, त्यात गोळा होणारे पैसे हे वाकचौरेंना देणार आहेत. साईबाबांच्या आशीर्वाद हा निष्ठावंतांना आहे, शिवसैनिकांना आहे, ठाकरेंना आहे, गद्दारांना कधीच नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंना धक्का
शिवसेना उबाठा गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे जिल्हा संघटक पै. रावसाहेब खेवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल जिल्ह्यातील 11 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी पदाचे राजीनामे दिल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.
उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांचे सहा खासदार हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. खा. वाकचौरे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटातून रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी तसेच खा. वाकचौरे यांचा समाचार घेण्यासाठी काल सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, खा. अरविंद सावंत, आ. आदित्य ठाकरे आदी शिर्डीत आले होते. तेथे त्यांनी जाहीर सभा घेऊन खा. वाकचौरेंचा समाचार घेतला. शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचे काम केले. मात्र, ठाकरेंनी पाठ फिरवताच गेल्या 18 वर्षांपासून शिवसेनेत काम करणारे निष्ठावंत जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी ठाकरे यांना राजीनामा पाठवला. त्यापाठोपाठ सर्व उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे (अकोले), हरिभाऊ शेळके (नगर उत्तर, नेवासा), सचिन बडधे (श्रीरामपूर); तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे (राहाता), मच्छिंद्र धुमाळ (अकोले), तालुका समन्वयक अशोक सातपुते (संगमनेर), शहरप्रमुख डॉ. संजय म्हसे (राहुरी) आदींनी पदांचे सामूहीक राजीनामे दिले आहेत.
राऊतांनी उमेदवाऱ्या अन् पदे विकली!
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याकडून निष्ठावंतांना सापत्न वागणूक मिळत होती. मध्यंतरी त्यांनी जिल्ह्यात परस्पर पदाधिकारी निवडी केल्या, गद्दारांनाच पदे दिली. या निवडी करताना जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अजिबात विश्वासात घेतले नाही. राऊत यांनी विधानसभेच्या उमेदवाऱ्यांसह जिल्हाप्रमुख व इतर पदे विकल्याचाही गंभीर आरोप पै. रावसाहेब खेवरे यांनी खासगी बैठकीत केल्याचे समजले.
राजीनाम्यास कारण की..
खेवरेंनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले, तर काही पदाधिकाऱ्यांनी काँग़्रेसबरोबर असल्याने खाली काम करण्यात अडचणी येत असल्याचे नमूद केले आहे, काहींनी पक्षांतर्गत जिरवाजिरवीला कंटाळून राजीनामा देत असल्याचेही निदशर्नास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेनेचा मेळावा घेणार
शुक्रवारी खेवरे यांनी आपल्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात शिवसेनेत जाण्याचा अंतिम निर्णय झाला. त्यानंतर रविवारी 10 ते 12 वाहनांमधून सर्व जण ठाण्याला गेले. खा. भाऊसाहेब वाकचौरेही तेथे गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत वाकचौरे-खेवरे यांची बंद खोलीत चर्चा झाली. खेवरेंचे पुनवर्सन तसेच कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे, असे महत्त्वाचे ‘शब्द’ही त्या वेळी मिळाल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच सोमवारी खेवरेंसह निष्ठावंतांचे अधिकृत राजीनामे झाले. आता दि. 9 किंवा 12 तारखेला शिर्डीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दिग्गजांचा जाहीर प्रवेश होणार असल्याचे समजते.