नगर: नागपूर-मुंबई प्रवासादरम्यान उबेर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून, हात-पाय बांधून कार व मोबाईल जबरीने चोरून नेणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर (जि. ठाणे) येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार, मोबाईल व इतर मुद्देमालासह एकूण ११ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शामसुंदर रविप्रताप गौड (वय २६, मूळ रा. उत्तर प्रदेश; सध्या रा. बदलापूर, जि. ठाणे), सिद्धार्थ मिथवा चव्हाण (वय १९, मूळ रा. आष्टी, जि. बीड; सध्या रा. बदलापूर, जि. ठाणे), किसन दिग्गीजय कहार (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश; सध्या रा. बदलापूर, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री फिर्यादी सोपान गोविंद दंडगुले (वय ३६, रा. दिघी, पुणे) हे उबेर कंपनीचे भाडे घेऊन नाशिक येथून शिर्डीकडे चालले होते. दरम्यान, कारमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांनी कोपरगाव परिसरामध्ये चालक दंडगुले यांना कार पोहेगावच्या दिशेने घेण्यास सांगितली. त्यानंतर आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे तोंड, डोळे, हात व पाय दोरीने बांधले. फिर्यादीचा मोबाईल व कार जबरीने चोरून आरोपींनी त्यांना वांबोरी (ता. राहुरी) परिसरात फेकून दिले व पळ काढला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्ह्याचा त्वरित शोध घेण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलिस अंमलदार सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान सानप, सतीश भवर, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथक आरोपींच्या शोधाकामी रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी बदलापूर (जि. ठाणे) येथे असल्याची समजले. त्यानुसार पथकाने छापा टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कारसह ११ लाख ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना तपासाकामी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कार विक्रीचा होता प्लॅन
आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून कार संभाजीनगर रस्त्यावरील जेऊर टोलनाक्याजवळ असलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये लॉक करून ठेवली होती. आरोपी ती कार विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात होते. परंतु, त्या आधीच पोलिसांच्या हाती लागल्याने कार विक्रीचा डाव फसला.