करंजी: कल्याण-निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव येथे सोमवारी (दि. 22) मध्यरात्री उसाने भरलेला ट्रक महामार्गावरच उलटल्याने 25 टन उसाचा अक्षरशः रस्त्यावर सडा पडला होता. या अपघातामुळे ट्रकसह शेतकऱ्याच्या उसाचेही मोठे नुकसान झाले असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 23) दुपारपर्यंत या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आल्याने तिसगावमध्ये वाहतूक कोंडी झाली.
गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने भाजी विक्रेते आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. गुरुवारी अशा स्वरूपाचा जर मोठा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी चर्चा तिसगावकारांमध्ये सुरू आहे.
वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रस्त्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने फूटपाथच्या पुढे काही लोकांनी अतिक्रमणे केली असून दुकानाचे बोर्ड, पाट्या लावून माती मुरूम टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. तसेच ज्या गतिरोधकामुळे या ट्रकचा अपघात झाला त्या गतिरोधकाची येथील काही व्यापाऱ्यांनी कचराकुंडी आणि दुकानाचे बोर्ड लावण्यासाठीउपयोग करत आहेत.
अगदी रस्त्याला चिटकून दुकानाचे बोर्ड पाट्या उभ्या केल्या असल्याने वाहतूक कोंडीला मोठा अडथळा होत आहे. काही भाजी विक्रेते दररोज महामार्गाला चिटकून भाजी विक्रीसाठी बसत असल्यानेही वाहतूक कोंडीला कारण ठरत आहेत. एकंदरीत तिसगाव येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी उद्योग व्यवसायाला अडथळा ठरणारी असून, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी रस्त्याला चिटकून दुकानाचे बोर्ड लावणाऱ्यांवर कारवाई करणार का?
सध्या शिरूर कासार या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस दौंड साखर कारखान्यासाठी नेला जात असून, रात्रंदिवस या मार्गाने ट्रकने उसाची वाहतूक सुरू आहे. मेहेकरीपासून पाथर्डीपर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे देखील ऊस वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावर गतिरोधकांची संख्या वाढल्याने वाहनचालकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.