सावकारकीला कंटाळून शेतकर्‍याने उच्चलं टोकाचं पाऊल; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीतून खळबळ File Photo
अहिल्यानगर

Pathardi News: सावकारकीला कंटाळून शेतकर्‍याने उच्चलं टोकाचं पाऊल; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीतून खळबळ

सावकारावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुका: पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथील गरडवस्ती वरील रहीवाशी बाबासाहेब नामदेव धायतडक (वय 46) या शेतकर्‍याने सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) याने वेळोवेळी दमदाटी व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे नमूद केले आहे.

फिर्यादी सचिन बाबासाहेब धायतडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी एक वर्षांपूर्वी म्हशी घेण्यासाठी बाळासाहेब बबन गर्जे याच्याकडून 10 टक्के व्याज दराने 6 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी 5 लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले होते. (Latest Ahilyanagar News)

मात्र तरीही बाळासाहेब गर्जे यांनी आणखी 5 लाख रुपयांची अवास्तव मागणी करत सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली. 11 जून रोजी गर्जे यांनी सार्वजनिकरित्या वडिलांना अपमानित करत शिवीगाळ केली व ’पैसे दे नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर कर’ अशी धमकी दिली.

दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवार दि. 12 जून 2025 रोजी सकाळी बाळासाहेब बबन गर्जे याचा पुन्हा फोन आला आणि पाथर्डी येथील कोरडगाव चौकात येण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या बाबासाहेब धायतडक यांनी सकाळी 9.30 वाजता घरून निघून आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी त्यांनी गावातील व्यक्तींना व्हॉट्सपवर एक चिठ्ठी पाठवली होती, ज्यात बाळासाहेब बबन गर्जे यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत आहे’ बाळासाहेब आज दहा वाजता पाथर्डी कोरडगाव चौकात येणार होता म्हणून आत्महत्या करीत आहे असे लिहुन शेवटी स्वतःची सही केली आहे.

गुरुवारी सायंकाळी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर बाळासाहेब गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाबासाहेब धायतडक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई पत्नी, एक विवाहीत आणि अविवाहित मुलगी तसेच दोन अविवाहीत मुले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT