

नगर: अहिल्यानगर महापालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतींची प्रारुप प्रभागरचना 15 जुलै 2025 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. यावर 21 जुलैपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविल्या जाणार आहेत. 31 जुलैपर्यंत हरकतींवर सुनावणी होऊन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला जाणार आहे.
आयोगाने संमती दिल्यानंतर अहिल्यानगर महापालिका आणि बारा नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रसिध्द होणार आहे. त्यासाठी महापालिका व नगरपालिका प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्ह्यातील अहिल्यानगर महापालिकेसह अकरा नगरपालिका व एक नगरपंचायतींच्या प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले होते. शासनाने गुरुवारी (दि.12) प्रभागरचनेसाठी आवश्यक तो कालावधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेची प्रभागरचना तयार करुन आयोगाला पाठविणे तसेच प्रारुप व अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करुन निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठविणे आदी अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. फक्त दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरना तर नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभागरचना तयार केली जाणार आहे. शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार 17 जूनपासून प्रारंभ होणार आहे. तयार झालेली प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव 4 जुलै ते 8 जुलै दरम्यान राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे निर्देश आयुक्त व मुख्याधिकार्यांना दिले आहेत.
आयोगाने मान्यता दिल्यानंतर महापालिका व नगरपालिकांची प्रारुप प्रभागरचना 15 जुलै ते 21 जुलैदरम्यान प्रसिध्द होणार आहे. 22 जुलै ते 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी वा त्यांनी नियुक्त केलेले महसूल अधिकारी सुनावणी घेणार आहेत. सुनावणीनंतर अंतिम झालेली प्रभागरचनेचा प्रस्ताव 7 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे पाठविला जाणार आहे. आयोगाने मान्यता दिल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तसेच पालिकांचे मुख्याधिकारी 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत.
या नगरपालिकांचा समावेश
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड, देवळाली प्रवरा व राहुरी अकरा नगरपालिका व नेवासा नगरपंचायतींचा कालावधी जवळपास तीन वर्षांपूर्वीच संपलेला आहे. या नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या बारा नगरपालिकांची प्रभागरचना करण्यात येणार आहे.