तिसरीच्या विद्यार्थिनीवरील अत्याचाराला फुटली वाचा; प्रकरण दडपण्यासाठी धमक्या देणार्‍या चौघांना अटक File Photo
अहिल्यानगर

Child Abuse Case: तिसरीच्या विद्यार्थिनीवरील अत्याचाराला फुटली वाचा; प्रकरण दडपण्यासाठी धमक्या देणार्‍या चौघांना अटक

मुख्य आरोपी शिक्षक फरार

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुका: तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकणार्‍या सातवर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेला अखेर वाचा फुटली. या प्रकरणात तक्रार दडपण्यासाठी धमक्या देणार्‍या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या सातवर्षीय मुलीवर गेल्या काही आठवड्यांपासून शाळेच्या सुटीच्या वेळी शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. आनंदनगर, पाथर्डी) याने वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलीने विरोध केल्यावर तिला मारहाणही केल्याचे उघड झाले आहे. (Latest Ahilyanagar News)

या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबाने गावातील आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण आणि उमर नियाज पठाण यांना दिली. मात्र, या चौघांनी पीडित कुटुंबावर तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला आणि गावात राहू न देण्याची धमकी दिली.

तरीही प्रकरण उजेडात आल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या चार जणांना अटक केली. या कारवाईत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, तसेच हेडकॉन्स्टेबल संदीप ठाकणे, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, इजाज सय्यद, अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड, अ‍ॅड. हरिहर गर्जे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत पीडित कुटुंबाला तक्रार दाखल करण्यास प्रोत्साहन दिले. सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात जाऊन या पीडित मुलीच्या कुटुंबाला धीर देत प्रकरण उजेडात आणले.

यात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, ‘स्नेहालय’चे गिरीश कुलकर्णी, तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

मुख्य आरोपी संजय फुंदे याच्या अटकेसाठी पोलिस पथक शोधकार्य करत आहे. या प्रकरणात आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी आणि जलदगती न्यायालयात खटला चालवून पीडितेला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी केली आहे.

या अमानुष घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT