

Housing project update
नगर: प्रत्येक कुटुंबाचे हक्काचे घराचे स्वप्न असते. शासनाच्या पुढाकारातून गेल्या वर्षभरात अशा सुमारे अडीच लाख कुटुंबांची घरकुलाची स्वप्ने साकार होत आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात 1 लाख 74 हजार कुटुंबांना निवारा नसल्याची माहिती ऑनलाईन सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या डोक्यावरही हक्काच्या घराची छत सरकार कधी बांधून देणार, याची प्रतीक्षा असणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे घरकुल योजनेला गती दिली आहे. नव्हे नव्हे तर राज्यात आज अहिल्यानगर जिल्हा हा सर्वाधिक घरकुले पूर्ण करण्याच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान आवास योजनेचे 1 लाख 89 हजार लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली होती. (Latest Ahilyanagar News)
यापैकी कालअखेर 1 लाख 27 हजार घरकुले पूर्ण होऊन त्या नव्या घरात संबंधित कुटुंबे राहायलाही गेली आहेत. राज्य पुरस्कृत योजनेची 54 हजार लाभार्थ्यांना घरे मंजूर झालेली असून, यापैकी पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार घरकुले पूर्ण झाल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, शासनाने बहुचर्चित ड यादीतील सर्व लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत. मात्र यातूनही वंचित राहिलेल्या कुटुंबांना आपले अर्ज सादर करण्यासाठी शासनाने आवाहन केले होते. जिल्हा परिषदेतूनही प्रत्येक ग्रामपंचायतीला याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यासाठी समिती नेमली होती. तसेच अर्जदारांना स्वतःही आपल्या मोबाईलवरील अॅप्सच्या माध्यमातून सर्व्हे करणे शक्य होते. त्यानुसार दि. 1 एप्रिल ते दि. 31 जुलैपर्यंत्त मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्हाभरातून 1 लाख 74 हजार कुटुंबांनी आपल्याला पक्की घरे नसल्याची माहिती देताना, घरकुलांची गरज असल्याचे म्हटले आहे.
अर्ज भरले; आता पुढे काय...!
जिल्ह्यातून 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यासाठी विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आधार बेसवर ही छाननी होणार आहे. यातून शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे आधारे पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी तयार केली जाईल. त्या यादीतील लाभार्थ्यांना सन 2026-27 या पुढील वर्षात घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे.
शासन आता किती पैसे देणार?
शासनाने आता घरकुल बांधणीसाठी अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे घरकुल बांधण्यासाठी वाळू सवलतीसह शासनाकडून 1 लाख 70 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय 28 हजार रुपये मनरेगाअंतर्गत मजुरी असेल तर 12 हजार शौचालय बांधकामाचे मिळणार आहेत. अशाप्रकारे एकूण 2 लाख 10 हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांना शासन देणार असल्याचे सांगितले जाते.
सीईओंच्या मार्गदर्शनात मोठ्या संख्येने घरकुले पूर्ण झालेली आहेत, तर अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. नुकतेच ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, त्या अर्जाची समितीमार्फत छाननी केली जाणार आहे. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल.
- किरण साळवे, सहायक अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा