

पाथर्डी तालुका: आठवीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोघांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. वेदांत दत्तात्रय कुलट (वय 14, रा. आष्टावाडा, पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वेदांत कुलट हा पाथर्डीतील एका खासगी विद्यालयात आठवीत शिकत आहे. गुरुवारी दुपारी शाळेतील परीक्षेनंतर तो घरी परतला. नंतर दुचाकीवरून कामासाठी वीर सावरकर मैदान परिसरात गेला. त्या वेळी त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले आणि किरकोळ वादातून अचानक धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. वेदांतच्या पाठीवर धारदार चाकूने वार करण्यात आल्याचे दिसून येते. (Latest Ahilyanagar News)
घटनास्थळी काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून वेदांतला तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, हेडकॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
जखमी वेदांतचा जबाब नोंदविल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून तपास सुरू आहे. हल्ला करणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके कामाला लागली आहेत. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हातात धारदार शस्त्रे पोहोचणे ही शिक्षण संस्थांपासून पालकांपर्यंत सर्वांसाठी गंभीर चिंता निर्माण करणारी बाब असल्याची चर्चा शहरात केली जात आहे.