थोरात-खताळांचे राजकारण थेट ‘रस्त्यावर’; 40 कोटींची रस्ता कामे रोखल्याचा खेमनर यांचा आरोप  Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Politics: थोरात-खताळांचे राजकारण थेट ‘रस्त्यावर’; 40 कोटींची रस्ता कामे रोखल्याचा खेमनर यांचा आरोप

आठ महिन्यात कुठलाही निधी न आणता, मंजूर कामे रद्द करून राजकारण करणे दुर्दैवी असल्याची टीका बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केली.

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधींनी आठ महिन्यात कुठलाही निधी न आणता, मंजूर कामे रद्द करून राजकारण करणे दुर्दैवी असल्याची टीका बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील वर्षी 13 मार्च रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन निधीची मागणी केली होती. (Latest Ahilyanagar News)

यानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली ते जवळेकडलग, खरशिंदे ते खांबे, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी, साकुर ते बिरेवाडी, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता, तासकरवाडी ते खंडेराया वाडी रस्ता या कामांचा समावेश होता. एकूण 30.570 किलोमीटर लांबीसाठी निधी मंजूर केला होता. मात्र 7 नुकत्याच नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.

मागील आठ महिन्यांत निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणार्‍या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत.

जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवालही खेमनर यांनी उपस्थित केला.

रस्त्याच्या कामात राजकारण करणे दुर्दैवी आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या या रस्त्यांची कामे रद्द झाल्याने डिग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळेकडलग, खरशिंदे, खांबा, मिर्जापुर, धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरवाडी,शिंदोडी, ठाकरवाडी, तासकरवाडी, खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी धांदरफळ खुर्द गावाकरीता आणि तालुक्यातील इतर 7 रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र फक्त राजकारण करावे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रद्द केलेल्या कामाचा हा प्रकार निंदनीय आहे.
-माजी सभापती निशाताई कोकणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT