

ahilyanagar voter list
नगर: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत 24 हजार 260 मतदारांची दुबार नावे असून, यामधील दुबार, मयत व स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना दिलेल्या निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र वाबळे यांनी म्हटले की, मतदारयादीच्या अवलोकनातून शहरातील सर्वच प्रभागामध्ये दुबार मतदारांची संख्या 24 हजारांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराच्या मतदारयादी भाग 1 ते भाग 297 मध्ये मयत मतदारांची संख्या देखील अधिक आहेत. ही नावे मतदारयादीतून काढून टाकावीत, अशी मागणी केली. (Latest Ahilyanagar News)
मतदारयादी भाग 1 ते 297 मतदार यादीभागावर कामकाज करण्यासाठी 297 बीएलओ नियुक्त आहेत. या बीएलओंमार्फत स्थळपाहणी करुन संबंधित दुबार नावे असलेली बोगस नावे वगळण्यात यावीत. स्थलांतरित झालेली नावे देखील शहरातील प्रभाग 1 ते 17 मधून वगळण्यात यावीत, अशी मागणी केली.
यापूर्वी 10 जुलै 2024 रोजी प्रभाग आठमधील दुबार नावाची यादी पुराव्यासह निवडणूक कार्यालयाकडे देण्यात आली होती. परंतु ती देखील कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.