Gopichand Padalkar in Karjat
कर्जत: आता हा देश पूर्वीचा राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देश झाला आहे. ही बाब लक्षात घ्यावी. आणि ज्यांच्या लक्षात येत नसेल, त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ पुन्हा पाहावेत, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे दिला आहे.
कर्जत येथील पुरातन हनुमान मंदिर व मल्लिकार्जुन मंदिर या परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अखंड हिंदू समाज यांच्या वतीने शुक्रवारी शहर बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आ. पडळकर बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार पडळकर आंदोलनामध्ये दोन तास सहभागी झाले होते. हे अतिक्रमण जर काढले नाही तर त्याची मोठी किंमत नगरपंचायत व महसूल प्रशासनाला मोजावी लागेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की पाकिस्तानवर कलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ बघा. हा पूर्वीचा भारत आता राहिलेला नाही. तुमच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू, शांतता राखू, बोलणी करू, असे यापुढे आता होणार नाही. यामुळे प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घ्यावी. ज्या गटात नंबर मध्ये न्यायालयाची स्थगिती नाही उर्वरित सर्वाधिक्रमण काढून टाका. (Ahilyanagar News update)
ज्या गटाच्या बोगस नोंदी केलेल्या आहेत त्या देखील तत्काळ रद्द करा. आणि हिंदूंच्या मंदिराचे पावित्र्य राखत नाही अशा कोणत्याही व्यक्तीला या परिसरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. यापुढे कोणत्याही जिहादीला सोडू नका असे पडळकर म्हणाले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की हा देश आता तिरंग्याला मानून भगव्याची पूजा करणारा आहे. आमच्या मंदिर परिसराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. अधिकार्यांनी अतिक्रमण काढले नाही तर पुन्हा कर्जतमध्ये येऊन आमच्या पद्धतीने अतिक्रमण काढू.
अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश देणारे प्रांताधिकार्यांचे पत्र तहसीलदार गुरू बिराजदार यांनी आमदार जगताप यांना दिले. यानंतर जवळपास तीन तास सुरू असणारे आंदोलन स्थगित करण्यात आले.