

श्रीगोंदा: आढळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात 548 डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके गुरुवारी आक्रमक झाले. आणि त्यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्याच्या कानशिलात लगावल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र खासदार लंके आणि विभागाचे अधिकारी दोघांनीही या वृत्ताचे खंडन केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, रस्त्याचे काम रखडल्याने सुभान तांबोळी यांनी आढळगाव येथे आमरण उपोषण सुरू केले होते. गुरुवारी (ता.15) खासदार निलेश लंके त्यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्यासाठी तेथे गेले होते. त्या वेळी वारंवार आंदोलने व उपोषण करूनही काम पूर्ण होत नसल्याच्या कारणाने खासदार लंके संतप्त झाले. (Latest Ahilyanagar News)
त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता व निखील कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीच्या अधिकार्याला जाब विचारला. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागले.
याला संबंधित कंपनी जबाबदार आहे आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत खासदार लंके यांनी श्रीगोंद्याला येऊन पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दरम्यान, खा. लंके यांनी या कंपनीच्या अधिकार्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा रंगली आहे.
पत्राच्या गैरवापराची तक्रार
श्रीगोंदे शहरातून जाणार्या या महामार्गाच्या मोजणीसंदर्भात खासदार लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र दिले होते. विभागाचे उपअभियंता अजित गायके यांनी पत्राचा चुकीच्या संदर्भाने गैरवापर करीत बदनामी व जनतेत संभ्रम निर्माण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली.
मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मी कोणालाही मारहाण केलेली नाही. फक्त माझ्या शैलीत जाब विचारला.
- खासदार निलेश लंके
या महामार्गावरील अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे जबाब घेऊन अपघातांच्या गुन्ह्यात कलम वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलिस अधिकारी
आमच्या कोणत्याही अधिकार्याला मारहाण झालेली नाही. पुढील चोवीस तासांत रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे ठेकेदाराने कबूल केले आहे. साठ दिवसांत काम पूर्ण करण्याची ठेकेदाराची जबाबदारी आहे.
-संजय शेवाळे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग