

नगर : शिक्षक दाम्पत्यास कोयत्याच्या धाक दाखवून दरोडा टाकणार्या टोळीतील पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोकमठाण चौफुली येथून जेरबंद केले. त्यात एका अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
राहुल केदारनाथ लोहकणे (वय 20, रा.कोकमठाण, ता.कोपरगाव), कुणाल अनिल चंदनशिव (वय 19), नीलेश बाळासाहेब भोकरे (वय 19), प्रमोद कैलास गायकवाड (वय 19, तिघे रा. संवत्सर, ता. कोपरगाव) व एका विधीसंघर्षित बालकाचा आरोपीमध्ये समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 6 मे 2025 रोजी संदीप रामदास बोळीज (रा. समतानगर, कोपरगाव)हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून वैजापूर येथून कोपरगावकडे येत असताना दरोडेखोरांनी रस्त्यात अडवून गळ्याला कोयता लावून सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेला. याबाबत संदीप बोळीज यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाकामी सूचना केल्या. त्यानुसार आहेर यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रणजित जाधव, विशाल तनुपरे, रमीजराजा आत्तार, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व उमाकांत गावडे यांचे पथक नेमून तपासाकामी रवाना केले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना बुधवारी (दि. 14) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस पथकास माहिती मिळाली की, वरील गुन्हा राहुल केदारनाथ लोहकणे (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) याने त्याचे साथीदारासह केला असून ते सध्या कोकमठाण चौफुली, कोकमठाण असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने कोकमठाण चौफुली येथे जाऊन वरील संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी एक मोबाईल व विधीसंषर्घित बालकाकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल असे एकुण 6 मोबाईल, दुचाकी असा एक लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीअंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासाकामी आरोपींना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.