नगर :अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात सर्वत्र शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. श्रीगोंदा, कर्जत, नगर व पाथर्डी या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. श्रीगोंदा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वत्र ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मे महिन्यात याआधी असा अवकाळी पाऊस कधी पाहिला नव्हता, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. शहर परिसरात रविवारी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. पडझड आणि शेतीचे नुकसान यामुळे ‘आता पाऊस थांबावा,’ अशी प्रार्थना सारेच करत आहेत. (Ahilyanagar News Update)
नगर तालुका : तालुक्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. तब्बल सोळा वर्षांनंतर मे महिन्यात मान्सूनचे आगमन होत आहे. पावसाचे तांडव अन् त्यातच कृषी सहायकांचा संप यामुळे खरिपाचे नियोजन कोलमडले आहे. मशागतीची कामे रखडल्यामुळे खरीप हंगाम पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. रूईछत्तीसी मंडलात शनिवारी रात्री अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुंडेगावच्या शुढळा नदीला पाणी आले. गुणवडीतील सहा बंधारे तुडुंब भरले. ओव्हर-फ्लोचे पाणी सीना नदीपर्यंत पोहोचले.
नेवासा : तालुक्यात सलग दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. रविवारी आठवडे बाजारात सर्वांची त्रेधातिरपीट झाली. या अवकाळी पावसाने शेतीच्या कामांना ब्रेक लावला आहे. सततच्या पावसामुळे उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याचा रंग बदलला असून अनेक ठिकाणी कांदा सडल्यामुळे तो फेकून देण्याची वेळ आली आहे. सोनईतही आठवडा बाजारकरूनची दाणादाण उडाली.
कर्जत ः मुसळधार पावसामुळे शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले असून काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी दिवसभर व रविवारीही जोरदार पाऊस पडला. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. मे महिन्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व जोरदार पाऊस तालुक्यामध्ये झाला आहे. या पावसामुळे केळी, डाळिंब व इतर फळबागा तसेच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. खरीप पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. आखोणीतून जाणार्या नांदणीलाही पूर आला आहे.
जामखेड : तालुक्यातही सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दोन दिवसापासून संततधार सुरू झाल्याने मशागतीचे कामे लांबणीवर गेली आहेत. या पावसाने शेतातील अनेक बांध फुटून शेतीचे देखील नुकसान झाले आहेत. अनेक भागांत पाणी साचले आहे. कांदा सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
श्रीगोंदा : तालुक्यातही पावसाने थैमान घातले असून या अवकाळी पावसामुळे डाळिंब, आंबा काढून ठेवण्यात आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वीस तासांत तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली आहे. नगर-दौंड रस्त्यावरील भीमानदी नजीक रेल्वे पुलाखाली पाणी साचून राहिल्याने आज दिवसभर वाहतूक खोळंबली होती. दुपारनंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली.
पारनेर ः तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला आहे. त्यात शेतमालाचे भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मेमध्ये कधीही एवढा पाऊस पडलेला नव्हता. मात्र या वर्षी पावसाने सर्व सरासरी ओलांडली आहे.
संगमनेर : तालुक्यातही पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. संगमनेर तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरातही या अवकाळी पावसाने गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही दिवसभर भुरभुर पाऊस सुरू होता.