मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या॥ आषाढीनिमित्त वारकर्‍यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज  File Photo
अहिल्यानगर

Ashadi Wari 2025: मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या॥ आषाढीनिमित्त वारकर्‍यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

298 दिंड्यांच्या स्वागतासाठी अहिल्यानगरचे प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

नगर: दहा दिवसांवर आषाढी वारी आली आहे. पंढरीच्या पांंडुरंग भेटीसाठी पायी जाणार्‍या संत निवृत्तीनाथ, संत निळोबाराय, संत एकनाथ महाराज यासह साधारणतः 298 दिंड्यांच्या स्वागतासाठी अहिल्यानगरचे प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काल सर्व विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन वारकर्‍यांच्या व्यवस्थेबाबत सूचना केल्या. याशिवाय पोलिस, आरोग्य, बांधकाम, महावितरण, मनपा यांच्याकडूनही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. (Latest Ahilyanagar News)

दरवर्षी पंढरपूरकडे वारकरी पायी दिंडीने जातात. या दिंडीत मोठ्या प्रमाणात वारकरी असतात. त्या वारकर्‍यांना वारीच्या मार्गावर पिण्याचे पाणी, मुक्कामाची व्यवस्था, औषधे इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. त्यासाठी विभागनिहाय जबाबदार्‍याही सोपविण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्यावर मुक्कामाच्या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक शाळा महाविद्यालयाच्या खोल्या तसेच मंगल कार्यालये उपलब्ध करून देणे, प्रसंगी वॉटर प्रुफ टेंट सुविधा देण्याची जबाबदारी आहे.

पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, महिला वारकरी यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था, दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची जबाबदारी आहे. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी दिंडी मार्गाची पाहणी करून दुरुस्तीसह आवश्यक सुविधांबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. कार्यकारी अभियंता दिलीप नन्नावरे व सागर चौधरी यांच्याकडे घोडेगाव ते भांबुरा, खडकी ते हातगाव, वाडगाव ते आंतरवाली, मुंगूसवाडी-पाथर्डी, कोरेगाव-रावगाव, या रस्त्यांच्या दुरुस्ती, खड्डे बुजवणे इत्यादी काम सोपवले आहे.

पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून दिंडी व दिंडी रथासमवेत पुरेसा बंदोबस्ताची जबाबदारी दिलेली आहे. दिंडीच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, मुक्कामाच्या ठिकाणी चोरी होऊ नये, यासाठी बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दिंडी मार्गावरील जड वाहने बंद करणे, याबाबतही ते नियोजन करताना दिसत आहेत.

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे शहरात मुक्कामी येणार्‍या दिंडीची व्यवस्थेची जबाबदारी दिलेली आहे. नगर शहरात दिंडीच्या मार्गावर स्वागत कमानी उभारणे, मुक्कामाच्या ठिकाणी अग्नीशमक गाडीची व्यवस्था यासह अन्य कामांसाठी त्यांची यंत्रणा काम करत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्याकडे दिंडी मार्गावरील दवाखाने, डॉक्टर यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करणे, मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथक पाठवणे, रुग्णवाहिका देणे, औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिलेली आहे. डॉ.चव्हाण यांनी काल याबाबत प्रशासनासमवेत बैठक घेऊन तयारीची माहिती घेतली.

अधिक्षक अभियंता बावीस्कर यांच्याकडे दिंडी मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे, साईडपट्ट्या, खड्डे बुजवणे, पारेगाव ते तळेगाव दिघे, देवळाली प्रवरा ते राहुरी, राहुरी ते वांबोरी (सडे मार्गे) हा रस्ता दुरुस्ती तसेच उपाययोजना कराव्यात इत्यादी.कामे आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यातच कामांना गती दिलेली आहे. ही कामे अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नगर-सोलापूर महामार्गावर तात्पुरत्या विसाव्यासाठी मंडप, खुर्च्या, पिण्याचे पाणी अशी प्रत्येक पाच कि.मी. सोय करत आहे. बेलवंडी ते बेलवंडी फाटा हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा, अशा सूचना आहेत.

महावितरण अभियंत्यांकडे मुक्कामाच्या ठिकाणी विद्यूत पुरवठा करणे, आदी जबाबदार्‍या आहेत. त्यांच्याकडूनही टीम तयार असल्याचे समजते. एकूणच, पालकमंत्री विखे पाटील यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हाधिकारी डॉ. आशीया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन वारकर्‍यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

प्रमुख सुविधांसाठी 3.99 कोटींचा प्रस्ताव

वॉटर प्रूफ टेंट उभारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पालख्यांसमवेत फिरते शौचालये उभारणे, फिरते स्नानगृह उभारणे, पिण्याचे पाणी सुविधा करणे, वैद्यकी सुविधा पुरवणे, निवारा केंद्र, मुलभूत सुविधा, स्वागत कक्ष इत्यादी कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतींवर जबाबदारी दिली जाणार आहे.पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी 3.99 कोटींची गरज आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठविला असल्याचे समजले.v

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात पंढरपूर पायी दिंडीतील वारकर्‍यांच्या सोयीसुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीडीओ व सर्व टीम फिल्डवर आहे. रस्ते, फिरते शौचालये, स्नानगृह, वॉटर प्रुफ टेंट याबाबतही व्यवस्था केली जात आहे.
- आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दिंडीच्या मार्गावरील संबंधित रस्त्यांची दुरुस्ती, साईडपट्ट्या इत्यादी कामे अखेरच्या टप्यात आहेत. याशिवाय पालकमंत्र्यांनी सूचना केल्याप्रमाणे आम्ही वारकर्‍यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.
- भरतकुमार बावीस्कर, अधिक्षक अभियंता, सा.बा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT