

नगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग शिवसेने (शिंदे गट) फुंकले आहे. संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात इच्छुकांचे प्रवेश होणार असल्याची माहिती शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली.
मेळाव्याची माहिती देण्याकरीता जाधव यांनी पत्रकार परिषदेत आगामी रणनिती अप्रत्यक्ष कथन केली. जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, गणेश कवडे, संजय शेंडगे यावेळी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकावयाचा असा निर्धार शनिवारच्या मेळाव्यात केला जाणार आहे. महापालिकेसोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्यांना मंत्री शंभूराज देसाई मार्गदर्शन करणार आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेवाशात विठ्ठलराव लंघे, संगमनेरचे अमोल खताळ हे दोन आमदार आहेत. या दोन तालुक्यात शिवसेनेकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जोर लावला जाणार आहे. जिल्ह्यातील तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी आणि इच्छुक मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती ठरविली जाणार आहे. महायुतीने निवडणुकीने सामोरे जायचे की स्वबळावर याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार असून तसा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाणार आहे.
मुरकुटे, छल्लारे शिंदे सेनेच्या वाटेवर!
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि उबाठा सेनेचे शहर प्रमुख संजय छल्लारे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट झाली असून या भेटीत प्रवेशाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी (दि.7) ठाण्यात मुरकुटे, छल्लारे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.