Tapovaneshwar Mahadev Temple Pudhari
अहिल्यानगर

Tapovaneshwar Mahadev Temple: विनायकनगरमध्ये तपोवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना; आमदार संग्राम जगताप यांचा धार्मिक एकतेचा संदेश

आदित्यनाथजी महाराजांच्या हस्ते महादेव पिंडी प्रतिष्ठापना; बुरुडगाव रोड परिसरात आध्यात्मिक उर्जेचे नवे केंद्र

पुढारी वृत्तसेवा

नगर : शहराच्या विकासाबरोबरच धार्मिक आणि अध्यात्मिक विकासाचीही खरी गरज आहे. बुरुडगाव रोड परिसराच्या विकासाचा पाया माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी रचला. आता या मंदिराच्या माध्यमातून परिसरात धार्मिकता आणि सुसंस्कृत पिढ्या घडतील असा आशावाद आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

विनायकनगर मातोश्री उद्यान येथे धार्मिक वातावरणात तपोवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात झाली. महादेव पिंडाची स्थापना आदित्यनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. तर महाआरती आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते पार पडली.

आमदार जगताप म्हणाले की, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र आले पाहिजेत. अशा प्रसंगी विचारांची देवाण-घेवाण होते आणि समाजात एकतेचा संदेश पोहोचतो. पूर्वी धर्मासाठी कार्य करणाऱ्या संतांनी समाजातील एकतेचा आदर्श घालून दिला. त्याच परंपरेतून हे महादेव मंदिर भाविकांच्या चांगल्या विचारांचे उगमस्थान ठरेल.

माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, विनायक नगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महादेव मंदिर स्थापनेची मागणी होती. ती आज पूर्ण झाली आहे. मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. आता या परिसरातील महिलांनी पुढे येऊन दररोज धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत आणि मंदिराचे पावित्र्य जपावे. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेविका मीनाताई चोपडा, सुनीता फुलसौंदर, संगीता भोसले यांच्यासह पसिरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरात सकारात्मक ऊर्जा

मंदिराचे पावित्र्य आणि परिसरातील स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या माध्यमातून धार्मिकतेची ऊर्जा निर्माण होईल आणि समाजात सकारात्मक ऊर्जा देणारे वातावरण निर्माण होईल, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT