टाकळीभान: टाकळीभान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी बसस्थानक परिसरात बसवलेला अश्वारुढ 20 फुट उंचीचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही. त्यासाठी आवश्यक परवानगी काढू, मात्र तोपर्यंत पुतळ्याला हात लावू नका, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी प्रशासनाने महापुरुषांच्या विटबंनाचे प्रकार घडत असल्याचे सांगून, हा पुतळा बसविण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिल्याचे दिसले. त्यामुळे ही बैठक प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वादळी व तितकीच वैचारीक पार पडल्याचे दिसले.
टाकळीभान येथे प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागिय पोलिस आधिकारी जयदत्त भवर, तहसिलदार मिलिंद कुमार वाघ व श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे उपस्थित होते. उपविभागिय पोलिस अधिकारी जयदत्त भवर म्हणाले की, महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी कायदेशीर परवानगीची गरज असते. पुतळ्याची विटंबना होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी समितीची आवश्यकता असते. मात्र हा पुतळा बसवताना कोणतीही कायदेशीर पुर्तता केलेली नाही. आम्ही प्रशासन म्हणून ग्रामस्थांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहोत.
यावेळी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनीही पुतळा बसवण्यासाठीची परवानगी घेतलेली नसल्याने व संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल उपस्थित केला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बाजार समितीचे संचालक मयुर पटारे म्हणाले की, पुतळ्याच्या कायदेशिर परवानगीसाठी ग्रामस्थांच्या वतीने कागदपत्रांची जाळवाजुळव करण्याचे काम सुरु आहे. येत्या दोन तीन महिन्यात परवानगीचे सोपस्कर पुर्ण केले जातील, तोपर्यंत पुतळ्याला हात लाव नये. उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, गावातील सर्वधर्मिय गुण्या गोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सर्व नागरीक घेत असून प्रशासनाने मात्र दबाव तंत्राचा वापर करुन पुतळा हटवू नये, तसा प्रयत्न केला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे म्हणाले की, टाकळीभान ग्रामस्थांची गेल्या 50 वर्षांची छत्रपतींच्या पुतळ्याची मागणी होती. अनेक ग्रामसभांमध्ये ठरावही झाले. मात्र कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांच्या स्वप्नपुर्तीसाठी तरुणांनी हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने लोकभावनेचा आदर करुन परवानगीसाठी सहकार्य करावे. माजी उपसरपंच भारत भवार म्हणाले की, पुतळ्याला कायदेशिर परवानगी मिळवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पुतळ्याची जागा कोणत्या विभागाची आहे यासाठी पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी आभिलेख विभागाकडे तातडीच्या मोजणीची मागणी केली आहे. तोपर्यंत पुतळा आहे त्या जागेवरच ठेवावा. टाकळीभान सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल पटारे म्हणाले की, पुतळा ही ग्रामस्थांची अस्मिता आहे. कायदेशिर परवानगीसाठी तरुण कामाला लागले आहेत. प्रशासनाने परवानगीसाठी सहकार्य केल्यास कायदेशिर पुर्तता लवकर होईल. मात्र तोपर्यंत पुतळा आहे त्या जागेवरच राहील.
अशोक कारखान्याचे संचालक शिवाजी शिंदे म्हणाले की, छत्रपतींचा पुतळा बसवला जावा ही 40 वर्षाची ग्रामस्थांची मागणी आहे. तरुणांनी ग्रामस्थांशी सल्लामसलत करुन थोर देणगीदार बाळराजे आवारे पाटील यांच्या देणगीतून पुतळा बसवला आहे. परवानगी न घेण्याची तरुणांची चुक झाली आहे. मात्र चुक सुधारण्यासाठी परवानगीचे कागदपत्र गोळा केले जात आहेत. त्यामुळे पुतळा आहे त्या जागेवरच राहु द्यावा असे त्यांनी सांगितले.
पुतळ्याच्या आजूबाजूच्या शासकिय गट नं. 245 व 246 वर अनेक अतिक्रमणे आहेत. शासकिय जागेत बिआर बार सुरु आहे. बस स्ट्ँडच्या जागेवर अतिक्रमण करुन गाळे बांधले जातात, मग छत्रपतींच्या पुतळ्यासाठी का वातावरण दुषित केले जात आहे.सुप्रिया धुमाळ, भा.ज.पा.महीला आघाडी
गेल्या पन्नास वर्षात गावात जातीय तेढ निर्माण झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्हा ग्रामस्थांची आहे. मात्र प्रशासनाने आमच्या हरवलेल्या बस स्ट्ँडचा लवकरात लवकर शोध लावून द्यावा.संजय रणनवरे, माजी संचालक सोसायटी