शेवगाव: राज्यातील गावागावांत चॅम्पियन खेळाडू तयार करण्याचे नवीन क्रीडा धोरण शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी जनतेने चांगला पहिलवान तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
जिल्हा तालीम संघ व वंदे मातरम् क्रीडा मंडळातर्फे देवाभाऊ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, येथील जिम व कुस्ती संकुलाचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते होणार होते. मात्र संबंधित जागा वादग्रस्त असल्याचे पुढे आल्यानंतर हा कार्यक्रम टाळण्यात आला.
बावनकुळे म्हणाले, राज्यातील 27 हजार ग्रामपंचायती व नगरपालिका नगरपंचायतींच्या प्रत्येक वॉर्डात एक चॅम्पियन खेडाळू तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय केंद्र व राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. चांगले पहिलवान तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांत शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज हे प्रश्न, सोबत शेतीला पाणी, वीज व पांदण शेतरस्ते ही कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 वर्षानंतर शेतकर्यांना शेतीसाठी 12 तास वीजपुरवठा करून वीजबिल भरावे लागणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
अरुण मुंडे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळून चांगले काम केले आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी 10 वर्षांत मतदारसंघात भरीव काम केल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. जिम व क्रीडा संकुलच्या जागेचा प्रश्न चर्चा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सभापती शिंदे, पालकमंत्री विखे यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. सरचिटणीस अरुण मुंडे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आ. विठ्ठल लंघे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी जि. प. सदस्य अर्जुन शिरसाट, भैय्या गंधे, कमलेश गांधी, नंदू मुंडे, माजी भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी, भाऊसाहेब वीर, पुरांगे, वैभव लांडगे, रामनाथ राजपुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कुसाळकर यांनी केले.
राजळे अनुपस्थित अन् ढाकणे हजर
या कार्यक्रमाला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची प्रामुख्याने अनुपस्थिती होती, तरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून त्यांचा नामोल्लेख करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी व्यासपीठावर आवर्जून हजेरी लावली होती. त्याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
स्पर्धेचा निकाल
देवाभाऊ केसरी- चेतन रेपाळे
उपविजेता- कौतुक डाफळे
तृतीय- विजय पवार