

श्रीरामपूर: तालुक्यातील वडाळामहादेव येथे आदल्या दिवशी झालेल्या वादातून एका तरूणावर दोघांनी मोटारसायलवर येवून ज्वलनशील पदार्थ (रसायन) फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडला. या हल्ल्यात ‘त्या’ तरूणाच्या मांड्या जळाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटाची पुनरावृत्ती याठिकाणी घडल्याने या घटनेची चर्चा सुरू होती.
तालुक्यातील हरेगाव फाटा येथे भेळीच्या दुकानात अर्जुन गांगुर्डे याचे अभिषेक जाधव याच्याबरोबर वाद झाले होते. ते वाद मिटवण्यासाठी किरण गांगुर्डे व त्याचा चुलत मामा राम वायकर तसेच समोरच्या पार्टीतील अभिषेक जाधव, विशाल जेठे, चैतन्य जेठे, अक्षय पवार अशा सर्वांमध्ये मिटवामिटवी चालू असताना समोरच्यांनी किरण गांगुर्डेस मारहाण केली. (Latest Ahilyanagar News)
किरण गांगुर्डे यांनीही याने देखील मारहाण केली. परंतु, नंतर किरण गांगुर्डे व त्याचे नातेवाईक अशोकनगर पोलिस चौकी येथे गेल्यानंतर तेथे वाद मिटल्याने सगळे घरी निघून गेले.
दुसर्या दिवशी सायंकाळी 8.30 ला किरण गांगुर्डे हा वडाळामहादेव येथील बिरोबा मंदिर येथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले असता तेथे अचानक अभिषेक जाधव, मोहन जेठे हे दोघेजण मोटारसायकलवर आले व त्यांनी किरण गांगुर्डे याच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ (रसायन) फेकला.
हे रसायन त्याच्या दोन्ही मांड्यावर पडल्याने प्रचंड आग होऊ लागली व त्यात फोड येऊन गंभीर जखमी झाले. जखमी किरण गांगुर्डेला तातडीने उपचारासाठी कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी किरण रमेश गांगुर्डेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अभिषेक जाधव, विशाल जेठे, अक्षय पवार, चैतन्य जेठे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.