

नगर: जिल्ह्यातील 12 गटांतील 47 हजार 133 ब्रास वाळूसाठ्यांच्या लिलावासाठी 2 जूनपर्यंत ऑनलाईन निविदा मागवल्या होत्या. परंतु या लिलावाकडे काणीचे फिरकले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर निविदेला मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. आता इच्छुक संस्था वाव्यक्तींना 10 जूनपर्यंत ऑनलाईन निविदा दाखल करता येणार आहे.
शासनाच्या नवीन धोरणानुसार हा पहिलाच लिलाव होत आहे. या लिलावातून शासनाला कमीत कमी 2 लाख 82 लाख 80 हजार महसूल अपेक्षित आहे. राज्य शासनाच्या नवीन वाळूधोरणानुसार जिल्ह्यातील पहिलाच वाळूसाठ्याचा जाहीर लिलाव 9 जूनला आयोजित करण्यात आला होता. (Latest Ahilyanagar News)
श्रीगोंदा तालुक्यातील 9 गटांतील 24 हजार 166, श्रीरामपूर तालुक्यातील 2 गटांतील 14 हजार 575 तर कर्जत तालुक्यातील 1 गटातील 8 हजार 392 ब्रास वाळूसाठ्यांसाठी 2 जून 2025 पर्यंत ऑनलाईन निविदा मागवल्या होत्या. 4 जून रोजी निविदा उघडण्यात आल्या असता एकही निविदा प्राप्त झाली नसल्याचे पुढे आले.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या निविदेला आता 10 जूनपर्यंत पहिली मुदतवाढ दिली आहे. प्राप्त होणार्या निविदा आता 12 जून रोजी उघडल्या जाणार आहेत. यालिलावासाठी कमीत कमी तीन निविदा दाखल होणे अपेक्षित आहेत. तीन निविदा उपलब्ध झाल्यास जाहीर लिलावाची तारीख निश्चित केली जाणार आहे.
बोलीपूर्वीच 25 टक्के अनामत रक्कम
वाळूलिलावासाठी शासनाने 600 रुपये प्रतिब्रास दर निश्चित केला आहे. निविदा दाखल करणार्या संस्था वा व्यक्तींना जाहीर लिलावात बोली लावण्यापूर्वीच वाळूसाठ्यांच्या एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम ही अनामत रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. ही रक्कम अधिक असल्याने प्रतिसाद मिळत नसावा अशी शक्यता आहे.