अमोल बी गव्हाणे
श्रीगोंदा: सकाळी ५ ची वेळ. काष्टी-तांदळीच्या शेतात अजून अंधार आहे. एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीतून एक मुलगी बाहेर पडते. पायात बूट, अंगात ट्रॅकसूट आणि डोळ्यात स्वप्नांचे आकाश घेऊन ती धावू लागते... तिच्या मागे धावते तिची प्रतिकूल परिस्थिती, तिचे कष्ट आणि तिचा संघर्ष. ही गोष्ट आहे सुरेखा मातने हिची. मंगळूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
सुरेखा मातने मूळची जालना जिल्ह्यातील रामनगरची. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातील एका ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्म. पोटाची खळगी भरण्यासाठी तिचे आई-वडील काष्टी-तांदळी भागात आले. वडील आज बागायतदार शेतकऱ्यांकडे सालदार म्हणून राबतात, तर आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करते. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने घरात शिक्षण घेणे हेच मोठे आव्हान होते.
लहानपणापासूनच सुरेखाला धावण्याची प्रचंड आवड. शाळेच्या एका पुस्तकात तिने 'फ्लाइंग सिख मिल्खा सिंग' यांची गोष्ट वाचली. मिल्खा सिंगने जशी गरिबीवर मात करून देशासाठी धाव घेतली, तसेच आपल्यालाही धावायचे आहे, हा विचार तिच्या मनात पक्का झाला. तेव्हापासून तिच्या प्रत्येक धावेमागे मिल्खाची प्रेरणा आहे.
तीन वर्षांपूर्वी तिने श्रीगोंद्याच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे तिला खरा ट्रॅक मिळाला. प्रा. कल्पना बागूल आणि क्रीडाशिक्षक संजय डफळ यांनी तिच्यातील धावपटूला ओळखले. रोज सकाळ-संध्याकाळ सराव, योग्य मार्गदर्शन आणि महाविद्यालयाची भक्कम साथ यामुळे सुरेखा घडत गेली. तिच्या वेगामुळे महाविद्यालयीन वर्तुळात तिला 'श्रीगोंदा एक्सप्रेस' हे नाव मिळाले.
अनेक स्थानिक मॅरेथॉन आणि क्रॉसकंट्री स्पर्धा जिंकल्यानंतर खरी परीक्षा होती नाशिक येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेची. दि. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खूप मागे टाकत प्रावीण्य मिळवले. या यशामुळे तिची निवड थेट मंगळूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी झाली आहे. या निवडीवर ती थांबणार नाही. तिचे ध्येय स्पष्ट आहे. गुणवत्ता असल्यानेच तिला इथपर्यंत मजला मारता आली. तिचे भविष्य उज्ज्वल आहे, असा विश्वास क्रीडाशिक्षक प्रा.संजय डफळ व्यक्त करतात. सुरेखा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणारी खेळाडू आहे. सुरेखाची ही यशोगाथा ही केवळ एका खेळाडूची गोष्ट नाही, तर महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांच्या, गरीब कष्टकऱ्यांच्या हजारो मुलांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.