नगर: राजकारणात आरोप-प्रत्यारोप, मतभेद आणि निवडणुकीतील संघर्ष हा लोकशाहीचा भाग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे नियोजन आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद असले, तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एक असल्याची पुस्ती विखे- थोरात समझोत्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी जोडली. त्याचाच दाखला देत अकोले तालुक्याची परंपरा पाहता येथील नेत्यांनी समन्वयाने एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे आ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांच्यात समझोता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू असून अकोले सोसायटी आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघात आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आ. किरण लहामटे यांच्या अर्जावर वैभव पिचड यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळताना दिसत असतानाच, डॉ. विखे पाटील रविवारी अकोलेत धडकले. त्यांनी लहामटे आणि पिचड यांना तालुक्याच्या विकासासाठी अन् शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
अकोले तालुक्याची वैचारिक परंपरा सर्वपक्षीय नेत्यांनी जपत समन्वयाने पुढे यावे, अशी अपेक्षा डॉ. विखे यांनी बोलून दाखवली. राजूर येथील विखे पाटील यांच्या व्यासपीठावर आ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुभाऊ नवले, कैलासराव वाकचौरे एकत्र आले.
अकोले तालुक्यात येताना काहीशी काळजी वाटत होती, अशी मिश्कील टिप्पणी करतानाच तालुक्यातील विविध प्रवर्गांतून अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. तालुक्याला वैचारिकतेची परंपरा आहे. राजकीय मतभेद असेलही, मात्र तालुक्याच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी दाखवली, तर विकासाला गती मिळू शकते, या शब्दांत डॉ. विखे यांनी आ. लहामटे-पिचड यांना समझोत्याच्या वाटेवर आणले.
आ.लहामटेंनी माझ्या शब्दाला मान द्यावा!
डॉ. सुजय विखे यांनी आमदार लहामटे यांच्याशी संवाद साधला. तुम्ही माझ्या एका शब्दाला मान दिला, तर मीही तुमच्या दहा शब्दांना मान देईन,’ असे सांगत परस्पर सन्मान आणि संवादाचे महत्त्व डॉ. विखे यांनी अधोरेखित केले. दरम्यान, डॉ. विखेंचा ‘तो’ शब्द म्हणजे आ. लहामटे यांना बँकेतून थांबण्याचा की आणखी कोणता याविषयी तर्कविर्तकाला तालुक्यात उधान आले आहे.