Mohtadevi Navratri Festival: मोहटादेवी गडासह अहिल्यानगर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

मोहटादेवीच्या सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक; केडगाव, बुऱ्हाणनगर आणि नवनागापूर येथील मंदिरांत घटस्थापना, भाविकांची गर्दी
Ahilyanagar Navratri
Ahilyanagar NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: बँड पथक आणि ढोल-ताशांच्या गजर.... देवीचा जयघोष.. अशा मंगलमय वातावरणात पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर रविवारी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. देवीच्या सुवर्ण मुखवट्याची मोहटेगाव ते मोहटादेवी गड अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवीच्या नवरात्रोत्सवातील पहिल्या रूपाचे भाविकांना दर्शन खुले झाले.

Ahilyanagar Navratri
Nevasa Theft News: नेवासा परिसरात चोरट्यांची दहशत; वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांचा जागता पहारा

परंपरेनुसार रविवारी मोहटेगावातून देवीच्या सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक गडावर पोहचली. मानकरी देविदास टाक यांनी देवीचा सुवर्ण मुखवटा डोक्यावर घेतला. मुखवटा गडावर आणल्यानंतर देवीच्या मुख्य स्वयंभू तांदळावर सुवर्ण मुखवटा चढविण्यात आला. सोन्याची नथ आणि विविध सुवर्ण अलंकारांनी देवीला सजविण्यात आले. फुलांच्या आकर्षक सजावटीने देवीचा गाभाराही सुशोभित करण्यात आला. देवीचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोहटा देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप आणि त्यांच्या पत्नी सुजाता जगताप यांच्या हस्ते सपत्नीक देवीचा महाभिषेक व घटस्थापना करण्यात आली.

देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. कल्याण बडे, अॅड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले उपस्थित होते. पौरोहित्य भूषणदेव साकरे, भास्कर देशपांडे आणि बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही घटस्थापनेच्या दिवशी देवीचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता महाआरती झाल्यानंतर देवीचे नवरात्रोत्सवातील पहिले रूप भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

Ahilyanagar Navratri
Khed Land Map Errors: सातबारा आपला, पण ऑनलाइन नकाशावर गट दुसऱ्याच शेतात!

केडगावच्या रेणुकामाता मंदिरात घटस्थापना

मोहट्याची जगदंबा शक्‍तिपीठांसह केडगावची रेणुकामाता, बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी, नवनागापूर येथील रेणुकामाता मंदिर आणि अहिल्‍यानगर जिल्हा व शहरातील घरोघरी पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चारांच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. घटस्‍थापनेनंतर भक्तीमय आणि उत्साही वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. केडगाव, बुऱ्हाणनगर येथे पहाटेपासून भाविकांची आदिशक्तीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. दरम्यान, घटस्‍थापनेसाठी आवश्‍यक असलेल्‍या साहित्‍यांची खरेदीसाठी कापड बाजार, माळीवाडा आणि सावेडी व तालुका बाजारपेठांत महिलांसह नागरिकांच्या उसळलेल्या गर्दीने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.

केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात रविवारी सकाळी साडेआठ वाजता उत्साहात घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली फुलांची सुंदर सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळी सहा वाजता रेणुकामातेचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरातील मंगळाई देवीचे पूजन, भवानी गुरव यांच्या पादुकांचे पूजन, भैरवनाथ मंदिराचे पूजन व परशुराम पूजन करण्यात आले. यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. उद्योजक पवन कोतकर व प्रतीक्षा कोतकर, संजय साबळे व अंकिता साबळे यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवीला पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली होती. गुरव परिवाराने धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.

Ahilyanagar Navratri
Mula River Dams: दुष्काळात मुळा नदीवरील आठ बंधारे भरले; शेतकऱ्यांना दिलासा

बुऱ्हाणनगर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात रविवार सकाळी नवरात्रौत्सवास भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. तुळजाभवानी देवीची सकाळी महापूजा, अभिषेक करून ध्वजारोहणा करून पुजारी विजय भगत आणि कुटुंबीयांनी विधिवत घटस्थापना केली. ‘आईराजा उदो उदो...सदानंदीचा उदो उदो..., तुळजाभवानी देवी की जय... असा जयघोष भाविकांनी केला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

घटस्थापनेपूर्वी महिलांनी डोक्यावर सजवलेले घट व पुरुषांनी भगवे ध्वज, हातात घेत तुळजाभवानी देवीचा जयजयकार करत मंदिराला प्रदक्षिणा मारली. मुख्य पुजारी अॅड.विजय भगत, दुर्गा भगत, अॅड.अभिषेक भगत व यांनी कुणाल भगत राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, रोहन भगत, अॅड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, अॅड.संकेत भगत, अक्षदा भगत, वेदिका भगत क्षताक्षी व वेद भगत वेद भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली आहे. तुळजाभवानी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Ahilyanagar Navratri
Ahilyanagar Municipal Corporation Tax Recovery: दिवाळी बोनससाठी महापालिकेची धावपळ; महिनाभरात ११ कोटींच्या वसुलीचे टार्गेट

दुष्काळावर मात करण्यासाठी आमदारांचे साकडे

नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आमदार संग्राम जगताप व शितल जगताप यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संबळाचा निनाद आणि देवीच्या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, पशुधनाचे रक्षण व्हावे, पाऊस पडावा आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवीच्या चरणी आ.जगताप यांनी प्रार्थना केली.

एमआयडीसी परिसरातून देवीची मिरवणूक काढण्यात आली. मोहटा देवी येथून आणलेली ज्योत घेऊन तरुण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आ.जगताप यांच्या हस्ते या ज्योतीद्वारे मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. धार्मिक वातावरण, संबळाचा गजर आणि देवीच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांसह विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news