Sugarcane Field Fire Pudhari
अहिल्यानगर

Sugarcane Field Fire: नेवासा, पानोडीत आगीचे तांडव; १३ एकर ऊस जळून खाक!

पाचेगावमध्ये ठिबक संचही जळाले; दोन्ही घटनांत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: तालुक्यातील पाचेगावमध्ये पाचेगाव फाटा ते पाचेगाव मुख्य रस्त्याच्या लागत असणाऱ्या गट २९ मधील उसाला अचानक आग लागल्याने या आगीत संपूर्ण दहा एकर ऊस खाक झाला आहे, त्यात चार एकरवरील उसातील ठिबक संचदेखील या आगीत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गट नंबर २९ मध्ये राहुल हरिभाऊ नांदे यांच्या पाच एकरवरील उसाच्या शेताशेजारील सोयाबीन पिकांचे खळे होते. त्या क्षेत्रात सोयाबीनचे काड पडलेले होते, ते काड मालक व गडी यांनी पेटवून दिल्यानंतर शेजारील उसाला आग लागली. ही घटना सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. दुपारी आग लागल्याने तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ असताना देखील काही करता येत नव्हते.

त्यात उसाला जोडून पोपट दत्तात्रय नांदे यांच्या पाच एकरवरील उसाला देखील आग लागली.वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयन्त करून देखील पूर्ण दहा एकर ऊस गळीत तोडण्यास आलेला या आगीत ऊस भस्मसात झाला. त्यात चार एकर असणाऱ्या ठिबक देखील या आगीत जळून गेले. काही स्थानिक ग्रामस्थांनी नेवासा नगरपंचायतीचे अग्निशामक दलला पाचारण करण्यात आले. थोडाफार ऊस विझविण्यासाठी यश आले असले तरी दोन्ही शेतकऱ्यांचे दहा लाखाच्या आसपास मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पानोडी येथे ३ एकर ऊस खाक

पानोडी (ता. संगमनेर) येथील प्रगतशील शेतकरी विक्रम शिवाजीराव थोरात यांच्या शिबलापूर शिवारातील उसाला बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागून तब्बल ३ एकर २० गुंठे क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत सुमारे २१० टन उसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकऱ्याचे अंदाजे ६ लाख ७२ हजार ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शिबलापूर येथे नव्याने उभारलेल्या वीज उपकेंद्रातील चाचणीदरम्यान वीजवाहिनीत स्पार्किंग होऊन ठिणगी उसाच्या शेतात पडल्याने आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आले. दरम्यान, संगमनेर पालिकेच्या जवानांनी अग्निशामक बंबासह घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT