नगर: प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीवर १२ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरातून ५५ हजार ८७७ दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ३७ हजार १७० नवीन मतदारनोंदणीसाठी दाखल झालेल्या अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, दावे व हरकती सादर करण्याची मुदत २६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.
मतदारयादी पूर्णपणे बिनचूक आणि पारदर्शक तयार करण्यासाठी जिल्हाभरात मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) राबविण्यात आली. त्यासाठी बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र प्राप्त केले. दरम्यान, अर्ज उपलब्ध न झालेल्या जवळपास ४ लाख २६ हजार मतदारांना वगळून जिल्हा निवडणूक विभागाने ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारसंख्या असलेली प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करण्याची संधी दिली होती. दरम्यान, आयोगाने १२ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकतीस मुदतवाढ दिली.
या दरम्यान, जिल्हाभरातून नवीन मतदार नोंदणीसाठी ३७ हजार १७० अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वाधिक संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ५ हजार ५६३ अर्जांचा, तर सर्वांत कमी राहुरी मतदारसंघातील २ हजार ५० अर्जांचा समावेश आहे. मतदारयादीतील नावांत वा इतर दुरुस्तीसाठी तसेच स्थलांतरसाठी १७ हजार ४४ अर्ज दाखल झाले.
वगळणीसाठी मात्र, १६६३ अर्ज आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले. दावे व हरकती दाखल करण्यास १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र, आयोगाने आणखी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मतदार नोंदणीपासून कोणी वंचित असल्यास संबंधितांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
नवमतदार नोंदणी अर्ज
अकोले : २२७४, संगमनेर : ५५६३, शिर्डी : २९९८, कोपरगाव : २३९९, श्रीरामपूर : ३१८१, नेवासा : २१६८,शेवगाव : ४३७८, राहुरी : २०५०, पारनेर : ४१५५, अहमदनगर शहर : २९९४, श्रीगोंदा : २५९४, कर्जत-जामखेड : २४८१.