नगर: एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने भाविकांसाठी अयोध्या, खाटू श्याम, अष्टविनायक व बालाजी दर्शन यात्रेनंतर आता द्वारकादर्शन बससेवा सुरु केली आहे. सोमवारी (दि.19) तारकपूर बसस्थानकातून दुपारी हिरकणी बस भाविकांना घेऊन गुजरातमधील द्वारका, सोरटी सोमनाथ, गिरनार तीर्थयात्रेसाठी रवाना झाली आहे.
अहिल्यानगर विभागातील तारकपूर आगाराच्या वतीने भाविकांसाठी पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी वार्षिक तीर्थयात्रांसाठी बससेवा सुरु आहेत. गेल्या काही वर्षांपासून अष्टविनायक, खाटू श्याम, बालाजी दर्शन बससेवा सुरु आहे. मध्यंतरी अयोध्या दर्शन यात्रा सुरु केलेली आहे. या दर्शनयात्रेला देखील भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
तारकपूर आगाराने आता जिल्ह्यातील भाविकांसाठी द्वारका दर्शन बससेवा उपलब्ध केली आहे. सोमवारी दुपारी 1 वाजता तारकपूर बसस्थानकातून द्वारका तीर्थयात्रेसाठी निमआराम हिरकणी बस 40 भाविकांसह मार्गस्थ झाली आहे.
यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील, बसस्थानक प्रमुख अविनाश कल्हापुरे, बसचे चालक गीताराम जगताप, अशोक टकले, वाहक जयदेव हेंद्रे, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे, सुरेंद्र कंठाळे, वाहतूक नियंत्रक किशोर केरूळकर, नितीन गाली, सुनील ढेरे आदी उपस्थित होते.
तिकिट साडेसहा हजार रुपये
चाळीस भाविकांचा ग्रुप असल्यास थेट भाविकांच्या गावात द्वारका दर्शन बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी एका भाविकाकडून साडेसहा हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. ही हिरकणी बस वणीच्या सप्तशृंगी गडामार्गे गिरनार पर्वत, सोरटी सोमनाथ व नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, द्वारका अशी तीर्थयात्रा करीत सहा दिवसांनी पुन्हा अहिल्यानगरला माघारी येणार असल्याचे आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी सांगितले.