

बोधेगाव: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (निपा) यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित यशस्वी शालेय नेतृत्व या विषयावरील राष्ट्रीय परिषदेसाठी वाघोली येथील केंद्र शाळेची निवड करण्यात आली आहे.
मुख्याध्यापिका शोभा मंडलिक यांनी विकसित भारत संकल्पना 2047 अंतर्गत यशस्वी शालेय नेतृत्व: एकविसाव्या शतकातील परिवर्तनात्मक मार्ग या विषयावर भारत आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे शाळेच्या विविध उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले.
या शाळेने लोकसहभागातून साधलेल्या सर्वांगीण विकासावर आधारित डॉक्युमेंटरीची राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी निवड झाली होती. ही डॉक्युमेंटरी उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर व दादा नवघरे यांनी तयार केली. देशभरातून आलेल्या 300 हून अधिक डॉक्युमेंटरींपैकी महाराष्ट्रातून केवळ चारची निवड झाली असून, नगर जिल्ह्यातून निवड झालेली ही एकमेव डॉक्युमेंटरी ठरली.
वाघोली ग्रामविकासाचे संकल्पक उमेश भालसिंग व सरपंच सुश्मिता भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून वाघोली येथील केंद्र शाळेत विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डायटचे प्राचार्य राजेश बनकर, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, तसेच केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे यांनी वाघोली शाळेचे अभिनंदन केले.