Soybean Low Prices Pudhari
अहिल्यानगर

Soybean Low Prices: साहेब, तुम्हीच सांगा... कशी करू दिवाळी!

सोयाबीनच्या भावघटीने शेतकऱ्यांचे दिवाळीवरील स्वप्न धूसर; रोगराई आणि तोट्याने हवालदिल शेतकरी

पुढारी वृत्तसेवा

अकोलेः सोयाबीनच्या उत्पन्नाच्या आशेवर शेतकऱ्यांनी अमाप खर्च केला. पण यंदा उत्पन्न मात्र अपेक्षित पदरात पडले नाही. त्यातच भावही साडेतीन ते चार हजारापर्यंत असा कमी मिळत आहे. त्यामुळे उसनवारी फेडावी कशी आणि पुढच्या पिकांचे नियोजन करायचे कसे, या प्रश्नात गुरफटलेल्या शेतकऱ्यांच्या मनात दिवाळीच्या धामधुमीतही अंधकार पसरलेला दिसला.  (Latest Ahilyanagar News)

नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले, कोतुळ, देवठाण, विठा, इंदोरी, चितळवढे, पैठण, पाडाळणे, आभोळ, कळस, निळवंडे, राजूर, उंचखडक, वाशेरे आदी भागांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनला मोठी पसंती दिली; परंतु यंदा अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस भरपूर प्रमाणात पडला.

या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकाची पेरणी केली. सर्व पिके चांगली भरली असतानाच मुसळधार पावसामुळे नगदी पीक असलेल्या अनेक पिकांना - दृष्ट लागली. त्यानंतर सोयाबीनला शेंगा लागल्या त्यावेळेस त्यावर ‌‘यलो मोझेंक‌’ नावाचा रोग पडला.

या रोगाचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषध त्यावर फवारले पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर कृषी विभागाकडे मार्गदर्शन मागितले; परंतु शेतकऱ्यांना म्हणावे तेवढे मार्गदर्शन मिळाले नाही. परिणामी नगदी पीक असलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले. उत्पन्नाच्या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी केली; पण आता भाव कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

गतवर्षी चार हजार चारशे रुपये भाव मिळाला होता. यावेळी कमीत कमी पाच हजार तरी भाव सोयाबीनला मिळेल, असे वाटले होते. प्रवरा पट्ट्यात सोयाबीन पिकावर रोग पडल्यामुळे उत्पादनात घट आली. सोयाबीनचे पीक उत्पादनापेक्षा अधिक खर्चाचे ठरले. सोयाबीन काढणी व मळणी यंत्र खर्च वाढला असून मजुरी वाढल्यामुळे सोयाबीन हे पीक तोट्याचे ठरले आहे.
प्रविण धुमाळ, शेतकरी, इंदोरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT