नगर: शालेय विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताणतणाव आणि आत्महत्येच्या वेदनादायी घटना रोखण्यासाठी नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने पुढाकार घेत ग्रामसभेत विशेष उपाययोजनांचे ठराव मंजूर केले आहेत. सौंदाळा गावाच्या याच धर्तीवर इतर गावांनीही विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी मानसिक आरोग्याचे कार्यक्रम राबवावेत आणि अशा उपक्रमांना 'जिल्हा मानसिक आरोग्य विभाग' व स्नेहालय संचलित 'मानसग्राम प्रकल्पा'चे सदैव सहकार्य लाभेल, असा आश्वस्त संदेश देण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहाचे औचित्य साधून विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सौंदाळा परिसरात गेल्या काही दिवसांत १३ ते १८ वयोगटातील ९ शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर सरपंच शरद आरगडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. सर्वांचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी यात विशेष करून गावाने समुपदेशक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, गोपनीय हेल्पलाइन, वाचन कट्टे व संवाद सत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि सप्ताहाचे औचित्य साधून मानसग्राम व जिल्हा मानसिक आरोग्य विभागातर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.
त्यातील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरातील तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये मानसिक आरोग्य जनजागृती करून विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. 'अनुभवलेल्यांचे ऐका...' या सदरात बरे झालेल्या रुग्णांचे ऑडिओ आत्मकथन विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. यामुळे गंभीर आजारातूनही पूर्णपणे बरं होता येते, हा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला. याव्यतिरिक्त एका मानसिक आजारी व्यक्तीच्या संघर्षाची आणि पुनरागमनाची कहाणी अधोरेखित करत मानसग्राम प्रकल्पातील लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि तणाव व्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज ध्यान, मैदानी खेळ, पुरेशी झोप आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करून मानसिक ताणतणाव कसा कमी करावा, याविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले.
समुपदेशकांचे मार्गदर्शन
समुपदेशक मीनल कटकोर यांनी भावनांचे प्रकटीकरण आणि मनमोकळ्या संवादावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगितले की, मनात कोणताही नकारात्मक विचार आला किंवा कसलाही ताण जाणवला, तर तो न लपवता तातडीने आपले पालक, विश्वासू शिक्षक किंवा समुपदेशकांशी मनमोकळेपणाने शेअर करावा. संवाद हाच सर्व मानसिक समस्यांवरचा सर्वोत्तम उपाय आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
मानसग्राम टीमचे योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसग्राम प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक रमाकांत दोड्डी, परिचारिका सोनाली साळवे, तसेच सोशल वर्कर समीक्षा पवार, रवीना आत्राम, हनुमान डावकर आणि गोपाल ठाकरे, गणेश धारकर, सर्व काळजीवाहक यांनी विशेष परिश्रम घेतले. सौंदाळा सरपंच शरद आरगडे आणि जिजामाता कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या जनजागृती मोहिमेला विशेष प्रोत्साहन दिले.
उपक्रमशील गाव सौंदाळा
सौंदाळा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील (ता. नेवासा) उपक्रमशील गाव म्हणून ओळखले जाते. या गावाच्या ग्रामसभेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘जातमुक्त गाव’ म्हणून जाहीर करत एक ऐतिहासिक ठराव केला. या निर्णयानुसार गावात जातीवरून भेदभाव न करणे, आंतरजातीय विवाह उत्साहात करणे आणि सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. गावात शिव्याबंदी, दररोज दोन तास मोबाईल वापर बंद ठेवणे, कन्यादान उपक्रम, विधवांचा सन्मान यांसारखे उपक्रम राबवले जातात. अंधश्रद्धांवर प्रहार म्हणून इथले सरपंच शरद आरगडे यांना नुकताच स्वतःचा दशक्रिया विधी केला होता.