Illegal Police Vehicle Checking Pudhari
अहिल्यानगर

Sonai Police Vehicle Checking: शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पोलिसांची कारवाई; अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र डोळेझाक?

सोनईत वाहन कागदपत्रांची तपासणी, पण अवैध रिक्षा व प्रवासी वाहतुकीवर कारवाई नसल्याने नागरिकांत संताप; दुहेरी निकषांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

सोनई: सोनई पोलिसांनी शनिदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांची अचानकपणे कागदपत्रांची तपासणी केली. यात किती वाहने अडवली, किती वाहनांना दंड झाला, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान येथून अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने पोलिसांसमोर जात असतानाही त्याकडे मात्र पोलिसांनी डोळेझाक केली.

सोनई परिसरात महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. टवाळखोरांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या सुरुवातीलाच कागदपत्री किरकोळ कारवाया दावविण्यासाठी पोलिस ठाण्यासमोरच पोलिस उभे होते. या कारवायात ट्रिपल सीट, वाहने जोरात चालवणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट तुटलेली या कारवाया होत असताना मशीन मार्फत दंड करणारा पोलिस हवालदारपदाचा कर्मचारी मात्र या ठिकाणी हजर नसल्याचे समजते. मग या कारवायांचा दंड मशीनमार्फत घेण्यात आला का?

शनिदर्शनासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे सध्या चांगलेच फावत आहे, यातच लटकूंचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. सोनई व घोडेगाव रस्त्यावर भाविकांची वाहने अडवून सक्तीचा ससेमिरा जोमाने सुरू झाला आहे. बेकायदा वाहतुकीमुळे सोनई परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले असून, अनेकांना मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहेत. सोनई पोलिस यंत्रणा अर्थपूर्ण तडजोडीला अग्रक्रम देत असल्याने परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना बंदी असतानाही भरदिवसा रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू आहे, या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेले असतात. सोनई-राहुरी रस्त्यावरून या रिक्षा जात असताना रस्त्यावरच पोलिस ठाणे असतानाही पोलिस या रिक्षांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतूकीकडे तसेच अनेक ट्रॅक्टर व डंपरमध्ये वाळू व मुरुमांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना नंबरच नाही, याकडे पोलिस यंत्रणा डोळेझाक का करतात, याचे न उलगडणारे कोडे आहे. बेकायदा वाहतुकीला सलाम व खासगी वाहनाने येणा-या भाविकांच्या वाहनांची अडवणूक सध्या चर्चेत आहे.

शनिभक्तांना पोलिसांची साडेसाती

ग्रहदेवता असलेल्या भगवान शनिदेवापुढे नतमस्तक झाले की असलेली साडेसाती सौम्य होईल, या करिता शिर्डी दर्शनाला आलेले भाविक शनिदर्शनासाठी येतात. मात्र, रस्त्यावर त्यांना पाच पोलिस ठाण्यांचे वाहतूक पोलिसांकडून होणारी अडवणूक पाहता भक्तांना शनीची नव्हे पोलिसांची साडेसाती अधिक त्रस्त करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT