कोपरगाव: आत्मविश्वास हाच आपला दागिना आहे. स्त्रीशक्ती ही लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि अन्नपूर्णा आहे. आपल्यातीलच आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू सध्या देशाच्या राष्ट्रपती आहेत आणि देशाचे सर्व आर्थिक व्यवस्थापन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाहत आहेत. त्यामुळे आपण कुठेही कमी नाहीत, हे सर्व महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. भलेही काहीही संकट येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची ताकद निर्माण करायची आहे, त्यासाठी सदैव आत्मविश्वास बाळगा, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
सरकार मान्यता प्राप्त नवक्रांती कौशल्य विकास प्रशिक्षण अकॅडमी यांचे वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शिलाई मशीन व आरी वर्क या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व सर्टिफिकेट वितरण करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी मतदारसंघातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक रमेश घोडेराव, नवक्रांती संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बागुल, राजश्री बागुल आदींसह महिला उपस्थित होत्या.
कोल्हे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांनाही माँ जिजाऊनी घडवलं म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. एका स्त्रीमध्ये भरपूर ताकद आहे. देशातील प्रत्येक महापुरुष हा एका स्त्रीच्या पोटी जन्मलेला आहे आणि त्या माऊलीनेच त्याला घडवलेले आहे. म्हणून प्रत्येक नवीन जीवास जन्म देण्याची ताकद आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. आपल्याला कोणाशी भांडायचं नाही, तर आपले विचार मांडायचे आहे. आम्ही सुद्धा काही करू शकतो, हे दाखवून द्यायचं आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना महिलांनी स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढावा. सर्वांच्या आरोग्यासोबत स्वतःचंही आरोग्य सांभाळावं. आपल्या परिवारावर प्रेम तर कराच, परंतु स्वतःवरही प्रेम करा, असा सल्ला त्यांनी महिला भगिनींना दिला.
विधवा होणं तिचा गुन्हा नाही!
विधवा होणं हा तिचा गुन्हा नाही, तिच्यावर आलेलं ते संकट आहे. तिला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी आहे. तिचा यथोचित सन्मान राहणं गरजेचं आहे, असे आवाहन यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित महिलांना केल्याचे दिसले.
महिलांना एकत्र करून बचत गट उभे केले
शिक्षणाला वय नसते. म्हणून आपण आयुष्यभर शिकत राहायचं असतं. मी आमदार झाले म्हणजे मी मोठी झाले असं नाही. तर मी आधी महिला मंडळात महिलांना एकत्र करून त्यांचे बचतगट सुरू केले. त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं ठरवलं. बऱ्याच महिलांना बँकेची ओळखही नव्हती. तशी आजची परिस्थिती महिलांसाठी अतिशय चांगली आहे, परंतु अशी परिस्थिती पूर्वीच्या काळी नव्हती. अनेक वर्षांपूर्वी काही प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नासाठी महिला एकत्र आल्या आणि त्या लढा दिला. तो लढा त्यांनी जिंकला, मग जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा व्हायला लागला. याचा अर्थ असा की आपण सर्व महिला एकत्र आलो की आपली ताकद मोठी होते, हे आपल्याला यातून शिकायला मिळतं.