Vote Pudhari
अहिल्यानगर

Shrisant Nagebaba Multistate Election: श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट निवडणूक जाहीर; कडूभाऊ काळेंना धक्का

नव्या सहकार नियमांमुळे दोन टर्म पूर्ण; 17 मे रोजी मतदान, 15 संचालकांची निवड

पुढारी वृत्तसेवा

नगर: श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. या नामांकित संस्थेची निवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी 17 मे रोजी मतदान होणार आहे; मात्र सहकार विभागाच्या नव्या नियमावलीनुसार दोन टर्म पूर्ण केलेल्या संस्थापक कडूभाऊ काळे यांना ही निवडणूक लढवता येणार नसल्याचे पुढे आले आहे.

तब्बल 1272 कोटींच्या पुढे ठेवी असलेली श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट या संस्थेचा पुढील पाच वर्षांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या 62 हजार 594 सभासदांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

सहकार विभागाच्या नव्या तरतुदीनुसार, दोन टर्म संचालक असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. या नियमाचा पहिला फटका हा कडूभाऊ काळे यांना बसणार असून, त्यांना संचालक मंडळातून बाहेर राहावे लागणार आहे. दरम्यान, सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित संस्थेला दिलेल्या पत्रातही विद्यमान चेअरमन यांनी दोन टर्म पूर्ण केल्याचे लक्षात आणून दिले आहे.

दि. 6 एप्रिल रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. 10 एप्रिलपर्यंत्त त्यावर हरकती स्वीकारल्या जातील दि. 17 एप्रिल रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होऊन 27 ते 29 एप्रिल सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. 30 एप्रिल रोजी छाननी 2 मेपर्यंत माघार आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी निश्चित होणार आहे. दि. 17 मे 2026 रोजी मतदान होईल. दि. 19 मे रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

यंदा 15 संचालकांसाठी होणार निवडणूक

संत नागेबाबा मल्टिस्टेटची गत निवडणूक प्रक्रिया ही 11 संचालक निवडण्यासाठी झाली होती. मात्र, सहकार कायद्यातील नव्या तरतुदींनुसार आगामी निवडणूक ही 15 संचालकांसाठी घेतली जाणार आहे. त्यासाठी राखीव प्रवर्गासाठीही जागा असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT