Water  Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा! ८ दिवस दररोज पाणीपुरवठा; त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस पाणी

भंडारदरा, निळवंडे धरणातून आवर्तन सुरू; १५ डिसेंबरपर्यंत नवीन वेळापत्रक, १५ फेब्रुवारीपर्यंत बॅलेन्सिंग टँकचे काम पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: भंडारदरा व निळवंडे धरणातून रविवार (दि. १५ नोव्हेंबर) पासून आवर्तन सोडल्याने आज सोमवार (दि. १६) पासून सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) पर्यंत सलग आठ दिवस दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवारी या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.

नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ससाणे यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक मुजफ्फर शेख, आशिष धनवटे, गटनेत्या वैशाली चव्हाण, सचिन गुजर, पाणीपुरवठा विभागाचे सभापती योगेश जाधव, दिलीप सानप, रितेश एडके, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बकाल आदी उपस्थित होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेऊन तातडीने रविवार (दि. १५ नोव्हेंबर)पासून तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. यामुळे पालकमंत्री विखे यांचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आभार मानले. त्यांच्या या निर्णयामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. आवर्तन सोडल्याने आज सोमवार (दि. १६ नोव्हेंबर)पासून सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) पर्यंत श्रीरामपूर शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवर्तन बंद झाल्यानंतर शहराला आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा १५ डिसेंबरपर्यंत केला जाणार आहे.

१५ डिसेंबर रोजी पुन्हा शेतीचे आवर्तन सोडले जाणार आहे. त्यावेळी आवर्तन सुरू असेपर्यंत दररोज शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवर्तन संपल्यानंतर पुढील आवर्तन येईपर्यंत पुन्हा पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक केले जाणार आहे. १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत बॅलेन्सिंग टॅन्कचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पाणी साठविता येणार आहे. त्यामुळे शहराला किमान दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल. पुढील पावसाळ्यात पाऊस कसा राहिल, याचा अंदाज नसल्यामुळे आपल्याला सदरचे पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह उपस्थित सदस्यांनी केले.

ठेकेदार काम पूर्ण करणार

जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू झाल्यापासून अनेक ठेकेदार अडचणीत आले आहेत. त्यांची देय रक्कम थकीत असल्याने ठेकेदार काम करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अन्य ठेकेदारही पेमेंट आल्याशिवाय काम जात नाहीत, मात्र तलावाचे काम करणारा ठेकेदार काम पूर्ण करून देणार असल्याचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.

तलावाचे काम वेगाने सुरू असून काँक्रीटीकरणासाठी एक आधुनिक तांत्रिक गाडी बोलविली आहे. यासाठी ७० ते ७५ मजूर काम करत आहेत. काँक्रीटीकरण झाल्यानंतर भिंती उभारण्यास वेग येऊ शकेल. १५ फेब्रुवारीपर्यंत बॅलेन्सिंग टॅन्कचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक होऊन ६० दिवस पाणी शहराला पुरेल एवढे क्षमता राहणार आहे. लवकरचं तलावाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नगराध्यक्ष करण ससाणे, नगरपालिका, श्रीरामपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT