राजेंद्र बोरसे
श्रीरामपूर: शहराच्या भविष्यातील 25 वर्षांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबवली जात आहे. विस्तारीकरण व खोलीकरणाचा काम वेगाने सुरू असून लवकरच 12 एकर जागेत श्रीरामपूरचा साठवण तलाव साकारला जातोय. दरम्यान, एकाच साठवण तलावातून पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून रहावे लागत असल्यामुळे सद्यस्थितीत शहराला दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहराला किमान चार ते पाच महिने दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात ही धग नागरिकांना सहन करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील 365 दिवस दररोज पाणीपुरवठा करणारी नगरपरिषद अशी ओळख असलेल्या श्रीरामपूर शहरात सध्या 178 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. सध्याची 775 दशलक्ष लिटर पाण्याची साठवण क्षमता 1350 दशलक्ष लिटरपर्यंत नेली जाणार आहे. या विस्तारामुळे शहराला एकदा तलाव भरल्यावर किमान 90 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असला, तरी नवीन तलावाच्या कामामुळे साठवण क्षमता तात्पुरती मर्यादित झाली आहे. आगामी काळात कालव्याच्या आवर्तनाबाबत अनिश्चितता आल्यास इतकी मोठी योजना असूनही शहराला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय प्रशासनाकडून विचाराधीन आहे.
तसेच नळ कनेक्शन दुरुस्तीसाठी वारंवार होणारी रस्त्यांची खोदाई टाळण्यासाठी आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. यामुळे नूतनीकरण केलेल्या रस्त्यांचे नुकसान टळणार असून, ग्राहकांना कनेक्शन घेणेही सोपे होणार आहे.
शहराला भविष्यात मीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने 30 कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, तसेच दुरुस्तीसाठी वारंवार होणारी रस्त्यांची खोदाई टाळण्यासाठी आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. यामुळे नूतनीकरण केलेल्या रस्त्यांचे नुकसान टळणार असून, ग्राहकांना कनेक्शन घेणेही सोपे होणार आहे. योजनेच्या 134 पैकी 20 किमी पाइपलाइन काम पूर्ण झाले असले, तरी काही भागांत जलवाहिनीच्या मार्गावरील अतिक्रमणांमुळे अडथळे येत आहेत.
नागरीकांनी सहकार्य करावे: मुख्याधिकारी
श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाच्या विस्तारीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. लवकरात लवकर नागरिकांना दररोज पाणीपुरवठा कसा मिळेल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किमान चार ते पाच महिने नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठ्यास तोंड द्यावे लागणार आहे. तरी नागरिकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
तीनशे कोटींचा अतिरीक्त प्रस्ताव: नगराध्यक्ष
श्रीरामपूर शहराची सगळ्यात मोठी पाणीपुरवठा योजना असून या योजनेमुळे शहराला 90 दिवस व नियमित पाणी पुरवठा होणार आहे. या चार पाच महिन्यात होणाऱ्या दिवसाआड पाणी पुरवठा होताना नागरिकांनी पाणी जपून वापरावे व ही योजना साकारण्यात सर्वांनी सहकार्य करावे. शहराला भविष्यात मीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने 30 कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.