श्रीरामपूर: श्रीरामपूर शहराला आठ दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावरून पालिका सभेत गुरूवारी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये गदारोळ झाला. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या समर्पक उत्तराने वातावरण काहीशे शांत झाले. नोव्हेंबर महिन्यात आवर्तनाची मागणीसोबतच कालावधी कमी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्याचा निर्णय घेतला.
नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. उपनगराध्यक्ष कांचन सानप, मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विरोधी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांनी पालिका पाणी वाटपात दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला. रेल्वे रुळाच्या पलीकडच्या दररोज पाणी, तर अलीकडील भागात मात्र पुरेसे पाणी पुरवले जात नाही, असा आरोप छाजेड यांनी केला. त्यावर सत्ताधारी नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी तीव्र आक्षेप घेतला.
विरोधकांवर निशाणा साधत नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय गांगड, स्नेहल खोरे आणि वैशाली चव्हाण यांनीही सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. अखेर नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
सभेत नवीन साठवण तलावाच्या रडखडलेल्या कामावरही चर्चा झाली. ठेकेदाराकडून काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल नगरसेवक आकाश बेग यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली. नगराध्यक्ष ससाणे यांनी उत्तर देताना सांगितले, ठेकेदारावर थेट कारवाई केल्यास काम बंद पडून प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होईल.
केंद्र सरकारच्या योजनेतून होणाऱ्या या कामासाठी पालिकेचा १० टक्के हिस्सा भरण्यात आला असून मार्च २०२७ ची मुदत असली तरी काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने पाणीपट्टीत सूट देण्याची मागणी नगरसेविका स्नेहल खोरे यांनी लावून धरली. मात्र, पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चाच्या आधारेच ही पट्टी आकारली जात असल्याने ती कमी करणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी स्पष्ट केले.
शहरात बंद पडलेले बोअरवेल शोधून ते तातडीने सुरू करावेत आणि पालिकेच्या बोअरवेलवर सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी सूचना श्रीनिवास बिहाणी व आशिष धनवटे यांनी मांडली.
मुळा प्रवरा सोसायटीची जागा नगरपालिकेकडे हद्यंतरीत करण्यात यावी याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच कोंढवाडा येथील गाळ्यांचे आरक्षण काढण्यात आले असून दोन महिला बचत गट, अनुसूचित जाती जमातीसाठी एक, दिव्यांगासाठी एक व बेरोजगार संघटनेसाठी दोन असे आरक्षण काढण्यात आले.
ओल्या व सुक्या कचऱ्यापासून तयार झालेल्या खताची विक्री दर कमी करण्याच्या प्रश्नावरही आरोप करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन उपनिधी २०२६ ला अंतिम मान्यता देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
डिसेंबरला आवर्तन, पाटबंधारेचा निर्णय
सध्या पालिकेच्या साठवण तलावात केवळ ११ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने पुढचे आवर्तन डिसेंबरमध्ये सोडणार असल्याचे कळवले आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्येच पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला.