

नगर: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ४७० कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यंदा टँकरच्या माध्यमातूनच जनावरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या आराखड्यात टँकरसाठी ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीयोजनांच्या एक किलोमीटर परिसरात उपशावर बंदी घालण्यात आली असून, जलसाठ्यांतून अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी पथके तैनात केली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात दीड ते दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असून, चारा उत्पादनवाढीसाठी सिंचन क्षेत्र असलेल्या शेतकर्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि.२९) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
या वेळी झेडपी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर आराळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त दशरथ दिघे, झेडपी सहाय्यक भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, यंदा पावसाअभावी दुष्काळी संकट ओढवले असून, पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्धी आदी प्रश्नाला प्राधान्य दिलेले आहे. जिल्ह्यातील टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत १ हजार ११० गावे आणि ५ हजार २३४ वाड्यांतील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३ हजार ८८७ उपाययोजना राबविण्यात येणार आहे.
त्यासाठी अंदाजे ४७० कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. जीपीएसशिवाय टँकर धावणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. टँकर भरण्यासाठी १५० जलस्रोत निश्चित केले असून, शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी फिल्टर बसवले जात आहेत. १६३ गावांत टँकरचे पाणीसाठवणुकीसाठी लवकरच सिंटेक्स टाक्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात २६ लाख १५ हजार ७०६ जनावरे असून, या जनावरांना प्रतिमहिना ८ लाख ९५ हजार मे. टन चारा लागतो. कृषीच्या अहवालानुसार आजअखेर २५ लाख २६ हजार २८७ मे. टन चारा उपलब्ध आहे. हा उपलब्द चारा दीड ते दोन महिने पुरेल इतका आहे. मात्र, अहिल्यानगर, जामखेड, पारनेर, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील ४१ महसूल मंडलांत आताच चारा तुटवडा निर्माण झाला आहे.
आगामी काळात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी रब्बी हंगामातदेखील पाच कोटी रुपये निधीतून १ लाख ७३ हजार ४२६ किलो बियाणे शेतकर्यांना वितरित केले जाणार आहे. या माध्यमातून ९ हजार ८९ हेक्टर क्षेत्रावर चारा पेरणी अपेक्षित असून, या ठिकाणाहून ३ लाख ४६ हजार ८८२ मे टन चारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय कृषी विद्यपीठाच्या माध्यमातून चारा उपलब्ध केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले. तरीही मे व जूनमध्ये चाराटंचाई निर्माण होणार आहे. याबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘हायड्रोपोनिक्स’साठी जनजागृती
चाराटंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाचा प्रयोग हाती घेतला आहे. हा चारा निर्माण करण्यास कमी खर्च, कमी पाणी लागते. तसेच हा चारा जनावरांसाठी पोषक आहे. शेतकर्यांचा कल हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाकडे वाढावा यासाठी तहसील, पंचायत समिती तसेच बाजार समिती कार्यालयांत शेतकऱ्यांना दृकश्राव्य चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावागावांत अधिकारी व कर्मचार्यामार्फत जनजागृती केली जाणार आहे.
पाणीयोजनांच्या गावांनाही टँकर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अकरा पाणीयोजनांवरील ८५ गावांना सध्या टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही टँकरची गरज भासली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेल्या जीवन प्राधिकरणाच्या ५२ तर झेडपी अंतर्गंत असलेल्या ४१३ पाणीयोजना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी झेडपीला २२२ तर जीवन प्राधिकरणाला २८८ कोटींचा निधी अपेक्षित आहे.