Shrirampur Rain Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Rain Crop Damage: श्रीरामपूरमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

रामनवमी यात्रेत पाणीच पाणी; गहू, कांदा, फळबागांना फटका, शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: शहर परिसरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पाऊस आणि गारपीट झाली. शहरात रामनवमीनिमित्त भरलेल्या यात्रा सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने विस्कळित झाली. वाऱ्यामुळे अनेक दुकानांचे छत उडाले, माल भिजल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे टरबूज, फळबागा तसेच गहू व कांद्यासह रबी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी छत उडाले.

सोमवारी दुपारनंतर जोराचो वाऱ्यासह धुळीचे लोट उठले. नंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यातच अनेक भागात गारपीटही झाली. शहरात रामनवमीनिमित्त थत्ते मैदानावर भरलेल्या यात्रेत पाणीच पाणी साचले व सर्वत्र चिखल झाला. वीजपुरवठाही रात्री उशिरापर्यंत बंद झाला होता.

टाकळीभान, खोकर, भोकर, कारेगाव, भेर्डापूर, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कमलपूर, भामाठाण, खानापूर, मुठेवाडगाव, माळवाडगावसह गोदावरी व प्रवरा पट्ट्यात रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका गहू, कांदा आणि इतर काढणीस आलेल्या पिकांना बसला. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा भिजला. गव्हासह चारा पिके आडवी झाली. फळबागांचेही मोठे नुकसान झाले. काही तासांतच अवकाळीने पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ठिकठिकाणांहून होत आहे.

संगमनेरला सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपल्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी सायंकाळी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून शासनाच्या मदतीची शेतकरी वाट पाहत आहेत.

पाथर्डीत मका, आंब्याचे नुकसान

तालुक्याच्या पूर्व भागाला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण, जांभळी आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विशेषतः बडेवाडी शिवारात गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेे. गहू, कांदा, हरभरा, मका तसेच आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कापणी करून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आंबा बागांनाही मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा पाऊस सुरू होता. खरवंडी कासार येथे पेठेत पाणी साचले. बडेवाडी परिसरात गारपिटीमुळे नुकसान अधिक असल्याचे सांगितले जात आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

नेवाशात कांदा-गव्हाचे नुकसान

तालुक्याच्या अनेक भागात याच महिन्यात दोनदा अवकाळी पावसाने दणका दिल्यानंतर सोमवारीही सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. त्यात फळबागांसह गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात 20 व 21 मार्च रोजी अवकाळीचा दणका बसला होता. सोमवारच्या पावसाने कांदा व गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. आंब्याच्या बागांमध्ये बहर व कैऱ्यांचा सडा पडला. तालुक्यातील मुकिंदपूर, खडका, नेवासा बुद्रुक, खलालप्रिंपी, मडकी, मुरमे, देवगड, बकुपिंपळगाव, माळीचिंचोरा, हंडीनिमगाव, गोंडेगाव, सलाबतपूर, दिघी, मक्तापूर, म्हसले आदी भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित झाला होता.

कोपरगाव तालुक्यात नुकसान

तालुक्याच्या पश्चिम भागात जवळके, रांजणगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर पाथरे आदी ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गहू, कांदे, मका, हरभरा, टरबूज, आंबे, द्राक्ष, ऊस, भुईमूग, काकडी, खरबूज आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीत रामनाथ चिने यांच्या शेतातील गहू, कांदा, मका, ऊस आणि आंबा पिकांचे नुकसान झाले. परशराम राहणे यांचे टरबूज पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले. डोळ्यादेखत नुकसान झाल्यामुळे काही शेतकरी धाय मोकलून रडत होते. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी चिने केली आहे.

देर्डे-कोऱ्हाळे परिसरात गारा

कोपरगाव तालुक्यात सोमवारी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने देर्डे-कोऱ्हाळे परिसरात परिसरात मोठे नुकसान झाले. या पावसात गारांचा मोठा मारा झाला. वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी, डाऊच परिसरात या पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी गव्हाचे पीक अजून शेतात उभे असून उन्हाळी कांद्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड या परिसरात झाली आहे. सोमवारच्या पावसाने या पिकांचे नुकसान झाले. अनेकांचा काढून ठेवलेला कांंदादेखील भिजला. सरकारने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण येवले यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT