श्रीरामपूर: तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ-शिरसगाव मार्गावर एका शिक्षकाच्या भरधाव कारने शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या ६ चिमुकल्यांना धडक देऊन जखमी केले. सध्या त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ-शिरसगाव मार्गावर गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राम्हणगाव वेताळ शाळा सुटल्यानंतर चिमुकले घरी जात होते. तेव्हा माळेवाडी हायस्कूलमधील शिक्षक कुंडलिक म्हाळूदास शिरोळे याने त्याच्या ताब्यातील एम.एच १४ बी.व्ही.२१५१ क्रमांकाची कार ब्राम्हणगाव ते शिरसगाव डांबरी रोडवरुन भरधाव वेगात चालवून रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या केशव आकाश बर्डे (वय ६), आकांक्षा आकाश बर्डे (वय ९), वैभव अमोल बर्डे (वय ६), प्रीती अमोल बर्डे (वय ८), प्रांजल बाळासाहेब तोरणे ( वय ७), श्रद्धा बाळासाहेब तोरणे (वय १२), यांना धडक देऊन जखमी केले.
धडकेनंतर विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेल्याने घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यासह इतर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवले होते. त्यांना लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मार्केट कमिटीचे माजी संचालक राधाकिसन आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका व रुग्णालयाशी समन्वय साधला. या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी एक पोलिस पथक पाठवून माहिती घेतली. त्यानंतर ते स्वतः घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आकाश हरिचंद्र बडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कुंडलिक म्हाळूदास शिरोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण शिंदे करीत आहे.