श्रीरामपूर: श्रीरामपूरमधील सय्यद बाबा चौक येथे रामनवमीच्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर 10 ते 12 अज्ञातांनी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाल्याचे दिसले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंत्तर तणाव निवळला.
रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनवणे यांच्या वतीने महादेव मंदिर, गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक दुपारी सुमारे 12.30 वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोडमार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गेपुढे जात सय्यद बाबा चौक येथे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली. या ठिकाणी काही अनोळखी 10 ते 12 तरुणांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. या दगडफेकीत सुयोग झिरंगे, किरण राजेंद्र लबडे, यश राजेंद्र गोराणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सुयोग झिरंगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
..तर कोणीही दगडफेकीची हिंमत करणार नाही
श्रीरामाच्या झेंडा मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आपण संघटित नसल्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे समाज एकत्र आला, तर दगडफेकीसारखे कृत्त्य करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, त्यासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
श्रीरामपूर येथे श्रीराम नवमीच्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक झाली त्याच्या निषेधार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक आकाश बेग, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, संजय गांगड, सिद्धार्थ फंड, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, श्रीराम नवमी निमित्त झेंडा घेऊन जात असताना दगडफेक करण्याचा प्रकार घडला. या घटनेत एका अल्पवयीन मुलाला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपण संघटित नसल्यामुळे अशा घटना घडतात. समाज एकत्र आला, तर कुणाचीही हिंमत होणार नाही,’ असे ते म्हणाले.
आ. संग्राम जगताप यांनी प्रशासनालाही इशारा देत, शहरातील अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई करण्याची मागणी केली. मागील वेळेस पालिकेने हिंदुंचीच अतिक्रमणे काढली. त्यांच्या धार्मिक स्थळांची अतिक्रमणे काढावीत. पालिकेने कारवाई करताना भेदभाव होता कामा नये. अन्यथा याविरोधात मोर्चा काढावा लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनीही तीव्र भूमिका मांडली. त्यांनी दगडफेकीच्या घटनेचा निषेध करत, अशा प्रकारांना कठोर प्रत्युत्तर देण्याची भूमिका व्यक्त केली.
सभेनंतर आमदार जगताप, सागर बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख तसेच तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले. घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.