श्रीरामपूर: मुंबई मधील बेलापूरला जाण्याऐवजी चुकून येथील बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या तामिळनाडू येथील एका मर्चंट नेव्हीच्या विद्यार्थ्याला येथील शहर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल रमेश रोकडे मेजर यांनी देवदूतासारखी मदत केली. भाषेचा अडसर असतानाही त्याला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रेल्वेत बसवून देत पोलिसांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
अँटो हर्षद (रा. तामिळनाडू) हा मर्चंट नेव्हीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मुंबई येथील सीबीडी बेलापूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता. मात्र, नावातील साधर्म्यामुळे तो चुकून श्रीरामपूर जवळील बेलापूर रेल्वे स्टेशनवर उतरला. अनोळखी परिसर आणि त्यातच हिंदी किंवा मराठी भाषा अजिबात समजत नसल्याने तो प्रचंड गोंधळून गेला होता. रात्रीच्या वेळी मोठी बॅग घेऊन तो येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हताशपणे फिरत होता.
(दि.28) मे रोजी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल रमेश ंरोकडे परिसरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तरुण मोठी बॅग घेऊन संशयास्पद आणि गोंधळलेल्या अवस्थेत उभा असलेला दिसला. रोकडे मेजर यांनी तात्काळ गाडी थांबवून त्याची आस्थेने विचारपूस केली.
त्या तरुणाला मराठी किंवा हिंदी येत नसल्याने संवाद साधण्यात अडचण येत होती. मात्र, रोकडे मेजर यांनी अत्यंत संयमाने त्याच्याकडून माहिती घेतली. तेव्हा तो तामिळनाडूचा असून मुंबईच्या सीबीडी बेलापूर ऐवजी चुकून या बेलापूर भागात आल्याचे समजले.
यावेळी रोकडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलिसांनी पुन्हा एकदा सार्थ करून दाखवले आहे. पुढील प्रवासाला निघताना अँटो हर्षद याने डोळ्यात आनंदाश्रू आणत थँक्स श्रीरामपूर पोलिस, थँक्स महाराष्ट्र पोलिस, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.
स्वतः तकीट काढून ट्रेनमध्ये बसवले
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोकडे यांनी त्या तरुणाला धीर दिला आणि आपल्या गाडीत बसवून रेल्वे स्टेशनवर आणले. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वतः त्याचे मुंबईसाठीचे रेल्वे तिकीट काढून दिले आणि त्याला सुरक्षितपणे मनमाड जंक्शन मार्गे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवून दिले.