Shrirampur Sand Mining Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Sand Mining Action: श्रीरामपूरमध्ये वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; 95 ब्रास वाळू जप्त, लाखोंचे साहित्य खाक

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची धडक कारवाई; जप्त वाळू गरिबांच्या घरकुलासाठी वापरली

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: श्रीरामपूर तहसीलदारांनी वाळू माफियांवर ‌’सर्जिल स्ट्राईक‌’ करत पाच दिवसांत लाखो रुपयांचे साहित्य खाक करण्यात आले. यात महसूल पथकाने 95 ब्रास वाळू जप्त केली आहे. या जप्त केलेल्या वाळूपैकी वांगी व खिर्डी येथे 21 ब्रास वाळू गरिबांच्या घरकुलासाठी देऊन प्रशासनाने माणुसकीचा चेहरा दाखविला आहे.

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या पाच दिवसांपासून वाळू माफियांवर ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’ सुरू केला आहे. श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने 15 ते 19 डिसेंबर दरम्यान ही मोठी कारवाई केली. विशेष म्हणजे, गोवर्धनपूर येथे नदीपात्रातील चप्पू शोधण्यासाठी चक्क नगरपालिकेच्या डिझेल बोटीची मदत घेण्यात आली.

16 डिसेंबर रोजी नायगाव येथे मोठी कारवाई करत 90 ते 95 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी वाळू उपशासाठी वापरली जाणारी 1.5 टन वजनाची यारी मशीन, जनरेटर आणि दोन फरांडी जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 17 डिसेंबर रोजी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 आणि 19 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 10 चप्पू तोडून जाळण्यात आले असून, सुमारे अडीच लाख रुपयांची मालमत्ता खाक करण्यात आली आहे. महसुल विभागाने केवळ कारवाई न करता जप्त केलेली वाळू खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम प्रशासनाने राबवला आहे. खिर्डी येथील 15 ब्रास वाळू 3 घरकुल लाभार्थ्यांना वाटण्यात आली. वांगी बुद्रुक येथील 6 ब्रास वाळू 2 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 ब्रास प्रमाणे देण्यात आली. नायगाव येथील जप्त वाळू देखील लाभार्थ्यांना देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम महसूल अधिकारी अशोक चितळकर, राजेश घोरपडे, राहुल साठे, अजय साळवे, दीपक साळवे, अक्षय जोशी, सुरेंद्र पवार, ऋषिकेश कदम, तुषार आगळे, सृजन कदम, बाळासाहेब कर्जुले, गोविंद खैरनार, गणेश शिंदे, प्रदीप चव्हाण, आकाश गावडे, सायली अमोलिक, महसूल सेवक तुळशीराम शिंदे, संदीप नवसारे तसेच नगरपरिषदचे कर्मचारी अनुप झरेकर, विशाल सोनावणे, मेहबूब शेख,आकाश शिंदे यांसह महसूल आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या फौजफाट्याने ही मोहीम फत्ते केली.

कडक कारवाईचा इशारा

तालुक्यात अवैध गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढेही अवैध उत्खनन किंवा वाहतूक आढळल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) नुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT