श्रीरामपूर: श्रीरामपूर ते पुणतांबा रोडवरील गोंधवणी शिवारात विक्रीसाठी आणलेले दोन विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. दोन लहान बालकामार्फत ही शस्त्रे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
याबाबतची माहिती अशी की, दोघेजण हे त्यांचेकडील दुचाकी गाडीवरून विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल घेवुन श्रीरामपुर ते पुणतांबा जाणारे रोडवर, गोंधवणी येथील हॉटेल निसर्ग येथे फिरत आल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्यांचे पथक तात्काळ कारवाईसाठी पाठविले.
दरम्यान, पथकाने परिसरात सापळा लावला. काहीवेळातच दोन इसम हे त्यांचेकडील मोटार सायकलवर संशयीत रित्या फिरताना मिळुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, विचारपूस केली. या चौकशीत दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली. त्यांचेकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांचे वाहनात एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
विधीसंघर्षीत बालक यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सांगीतले की, त्यांचा मित्र शादाब जावेद शेख, (रा. वेस्टन चौक, वार्ड नं.2, श्रीरामपुर) याचेकडुन विक्री करण्याचे उददेशाने संबंधित विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल आणल्याचे सांगीतले. तसेच अशाच प्रकारचा एक विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल शादाब शेख याचेकडेही आहे, अशी माहिती दिली.
त्यानुसार, पोलिसांनी शेख याच्या घरी छापा टाकला. या कारवाईत त्याने एक जिवंत काडतुस व विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल असल्याचे कबुली देवुन त्याने ते त्याचे घराचे बाजुला असलेल्या भिंतीलगतच्या पत्र्याखालुन ते काढुन दिले. या कारवाईमध्ये दोन विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल, मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला शादाब जावेद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शादाब जावेद शेख याने दोन अल्पवयीन मुलांना गावठी कट्टे विकले होते का, त्याने ते कोणाकडुन आणले होते, ते कोणास विक्री करणार होते, याची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणार का, याकडे श्रीरामपुरकरांचे लक्ष आहे.