Shrirampur Illegal Pistol Seized Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Illegal Pistol Seized: श्रीरामपूरमध्ये गावठी पिस्तुल विक्रीचा डाव उधळला; चौघांना अटक, 5.95 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणलेले पिस्तूल, काडतुसे आणि कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने श्रीरामपूर-वाकडी रोडवर पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार गावठी पिस्तुलासह चार जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एका पिस्तुल, जिवंत काडतूस असा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सागर दत्तू उपळकर (वय २८), विशाल रामकिसन गुंजाळ (वय २६), ऋतिक भगवान गुंजाळ (वय २५), पवन गोरख उपळकर (वय २७, सर्व रा. रामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर व अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले होते.

पोलिस पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाकडी-श्रीरामपूर रोडवर एका कारमधून चार जण बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाकडी रोडवरील यशवंत बाबा चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ अत्यंत शिताफीने सापळा रचला. संशयित मोटारकार अडवून चौघांना ताब्यात घेतले.

त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. चौकशीत त्यांनी मध्यप्रदेशातून पिस्तूल श्रीरामपूर येथे विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार रमीजराजा आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT