बदनामी झाली अन् 50 हजारही गेले; श्रीरामपुरातील कर्मचारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात  Pudhari
अहिल्यानगर

Honey Trap Case: बदनामी झाली अन् 50 हजारही गेले; श्रीरामपुरातील कर्मचारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात

एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचार्‍याला चांगलीच महागात पडली.

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचार्‍याला चांगलीच महागात पडली. 50 हजार रुपये रोख भूर्दंड भरुन इज्जतीचा पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचार्‍यांवर आली पण रात्रीच गोंधळ दिवसाच मिटला अन् त्याने सुटकेचा निश्वास टाकला.

तालुक्यातील एका गावात एक मुलगा दिव्यांग होता. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी एका कर्मचार्‍याला आदेश दिला की त्या दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा. वरिष्ठाच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला, त्याने दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ, शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली.  (Latest Ahilyanagar News)

त्याचबरोबर त्या मुलाचे अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आणा ते कसे करायचे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. काही अडचण आल्यास माझ्या फोन नंबरवर संपर्क साधा, असे सांगून त्या कर्मचार्‍याने आपला फोन नंबर त्या महिलेला दिला. त्यानंतर दिवसभर त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचार्‍याला फोन केले.

तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगाची माहिती व येणार्‍या अडचणी विषयी सांगत होता. हे सर्व झाल्यानंतर सायंकाळी ती महिला विचारपूस करत राहुरी येथील ‘त्या’ कर्मचार्‍याच्या घरी गेली व तेथे आरडाओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला, याने नको ते केले, असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले, तसे ती महिला आणखीनच जोर जोरात ओरडू लागली. त्यामुळे त्या कर्मचार्‍याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह जवळच असलेले बेलापूर गाठले. बेलापूरला आल्यानंतर ते सरळ पोलिस स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्या कर्मचार्‍याला होती, परंतु तिथेही संबंधित महिलेने एकच रट लावून धरली.

त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला. त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती महिला एका विषयावर ठाम राहिली. रात्री अकरा वाजता सुरू झालेले नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेवटी त्या महिलेने आपला प्रस्ताव ठेवला. मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहाखातर त्या कर्मचार्‍याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला.

वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकार्‍यांबरोबर काम करत होता, पण एका महीलेपुढे त्याला हतबल व्हावे लागले. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत. या याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे समजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT