श्रीरामपूरः पैशाची सतत मागणी करीत विवाहित महिलेचा सासरी अहिल्यानगर येथे छळ करण्यात आला आहे. शबनम शाहरूख शेख असे विवाहितेचे नाव आहे. श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. 2, बजरंग चौकात तिचे माहेर आहे. शबनम शेख हिचा विवाह अहिल्यानगर येथील शाहरूख शेख याच्याशी (दि. जून 2024) रोजी करण्यात आला. लग्नात 1 लाख रूपये हुंडा, सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट दिले होते. (Latest Ahilyanagar News)
सासरच्या लोकांनी तिला 15 दिवस चांगले नांदवले. यानंतर, ‘लग्नात हुंडा कमी दिला, आणखी 2 लाख रूपये घेवून ये,’ अशी मागणी करीत तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. ‘तू मला पसंत नाही. मला दुसरा निकाह करायचा आहे,’ असे म्हणत पती तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. ‘मला दुसरे लग्न करायचे आहे. ते लोक मला 10 लाख रूपये देणार आहेत,’ असे सतत सांगितले जात होते. ‘तलाक दे’ असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शबनम शाहरूख शेख यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाहरूख शेख, राबीया शेख, फातेमा शेख, राजू शेख, मोईन शेख, अरफात शेख, रेहान शेख, राजमीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहे.