श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरात एका महिलेला पान खाल्ल्यानंतर चक्कर, बडबड, मळमळ अशी लक्षणे जाणवल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे गोड पानाच्या नावाखाली नशेची पावडर वापरली जात असल्याचा गोरखधंदा सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आतापर्यंत दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा आता या घटनेमुळे उघडपणे समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने एका पान स्टॉलवरून गोड पान घेतले होते. पान तोंडात टाकताच काही मिनिटांतच तिला चक्कर येऊ लागली. डोके जड झाले, मळमळ सुरू झाली, ती असंबंध बडबड करू लागली. घरच्यांनी प्रसंगावधान राखत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली.
साध्या गोड पानाने असं होत नाही, हे घरच्यांना आणि डॉक्टरांनाही कळलं. त्यामुळे पानात न सांगता जर्दा, किमाम किंवा इतर नशेची पावडर मिसळली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर तालुक्यातील अनेकांनी आपले अनुभव सांगितले. यापूर्वी पान खाल्ल्यानंतर चक्कर, घाम येणे, हात-पाय कापणे, उलटीसारखे वाटणे असा त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. साध्या गोड पानात गुलकंद, सौंफ, वेलची, चेरी असते. त्याने नशा येत नाही. मात्र, काही पान स्टॉलवर 'स्पेशल पान', 'झटका पान', 'किक पान', 'मसाला पान' या नावाखाली ग्राहकाला न सांगता गुटख्याची पावडर, तंबाखू पावडर, जर्दा, किमाम, कपुरी यांसारखे पदार्थ मिसळले जात असल्याचा संशय आहे.
काही ठिकाणी, तर ग्राहकाला गुंगवण्यासाठी अज्ञात नशेची पावडर मिसळली जात असल्याचाही संशय आहे. हा प्रकार बेकायदेशीर आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.शाळा, कॉलेज, बसस्थानक, आठवडी बाजार, जत्रा परिसरातील स्टॉलवर हा प्रकार जास्त होत असल्याचे आढळून येते .पहिल्यांदाच पान खाणाऱ्या तरुणाला 'स्पेशल देतो' म्हणून स्ट्रॉंग पान दिले जाते. एकदा नशेची चटक लागली की तो तरुण पुन्हा त्याच दुकानात जातो, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.
१६ ते २५ वयोगटातील तरुण हे याचे सर्वात मोठे टार्गेट आहे. मित्रांच्या आग्रहाखातर एकदा पान खाल्लं की, त्याची नशा त्याला पुन्हा खेचते. पुढे तोच तरुण जर्दा, गुटखा, तंबाखू, सिगारेटकडे वळतो. यालाच 'गेटवे नशा' असे म्हटले जाते.
नशेच्या पदार्थामुळे गंभीर परिणाम
पानात मिसळलेल्या नशेच्या पदार्थामुळे तत्काळ आणि दीर्घकालीन असे दोन्ही परिणाम होतात. तत्काळ चक्कर, उलटी, घाम, हृदयाचे ठोके वाढणे, हात-पाय कापणे, झोप येणे अशी लक्षणे दिसतात. दीर्घकाळ सेवन केल्यास तोंडाचा कॅन्सर, तोंड न उघडणे, दात खराब होणे, हिरड्यांचे आजार, पोटाचे विकार, किडनी आणि हृदयावर ताण, व्यसनाधीनता, मानसिक अस्वस्थता असे गंभीर परिणाम होतात.
‘त्या’ स्टॉलवरील साहित्याची तपासणी करा
या घटनेमुळे नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तातडीने सर्व पानस्टॉलची तपासणी करावी. ज्या स्टॉलवरून महिलेने पान घेतले, तेथील साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी व्हावी. शाळा-महाविद्यालय परिसरातील स्टॉलवर विशेष लक्ष द्यावे. जेणेकरून मसाले पान, गोड पानाच्या आडून सुरू असलेला नशेचा बाजार रोखता येईल.
शाळा परिसरात धंदा जोरात
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री शाळा, महाविद्यालय परिसरापासून १०० मीटर अंतरात करण्यास बंदी आहे. १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे हा गुन्हा आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार पानात कोणताही नशेचा, भेसळीचा पदार्थ मिसळणे बेकायदेशीर आहे. असे आढळल्यास दंड आणि दुकान बंद करण्याची कारवाई होऊ शकते. मात्र प्रत्यक्षात तपासणीच होत नाही. त्यामुळे हा धंदा बिनधास्त सुरू आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.
रात्री आठच्या सुमारास चक्कर, मळमळ अशी लक्षणे दिसणारी महिला रुग्ण माझ्याकडे आली होती. विचारपूस केली असता नातेवाईकांनी संबंधित महिलेने गोड पान खाल्ले असल्याचे सांगितले. पानात काही तरी नशेचा पदार्थ टाकला असावा, त्यामुळेच त्या महिलेला त्रास झाला."उपचार करणारे डॉक्टर