Shrigonda Police Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांची धडक कामगिरी; CMIS पोर्टलवर ७,७१९ आरोपींची नोंद, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

फरार व सराईत आरोपींचा शोध घेणे होणार सोपे; एका क्लिकवर मिळणार गुन्हेगारीची अद्ययावत माहिती

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: गुन्हेगार आणि आरोपींची अद्ययावत माहिती ठेवणाऱ्या 'सीएमआयएस' पोर्टलवर श्रीगोंदा पोलिसांनी तब्बल ७ हजार ७१९ आरोपींची यशस्वी फीडिंग (नोंदणी) पूर्ण करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या धडक कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक आरोपींची नोंदणी करणारे श्रीगोंदा पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने अत्यंत बारकाईने ही मोहीम राबवली. यामध्ये आरोपीवर दाखल असणाऱ्या गुन्ह्याची माहिती ही एका क्लीकवर समजून येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसवणे, फरार व सराईत आरोपींचा शोध घेणे आणि कायदेशीर प्रक्रिया अधिक गतिमान करणे या उद्देशाने ही नोंदणी करण्यात आली आहे.

या यशाबद्दल पोलिस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आगामी काळातही गुन्हेगारी निर्मूलनासाठी अशीच कठोर पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ही प्रणाली महाराष्ट्रभर काम करत असून कोणत्याही आरोपीची माहिती कोठेही आणि कधीही सहजासहजी उपलब्ध होऊ शकते.

या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्ह्यातील आरोपींची सर्व माहिती मिळणार असून, आरोपींवर केलेली प्रतिबंधक कारवाई व भविष्यात करावयाची नियोजित कारवाई समजणार आहे. सर्व आरोपीचे अद्ययावत फोटो मिळणार असून, फरार, तडिपार आरोपींची माहिती उपलब्ध होणार आहे. हद्दीत राहून बाहेर गुन्हे करणारे किंवा बाहेरून येऊन हद्दीत गुन्हे करणाऱ्यांची माहितीही या प्रणालीमुळे मिळणार आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या देखरेखीखाली श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT