Police Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Police Campaign: श्रीगोंदा पोलिसांची ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’; १५ दिवसांत १४६ प्रकरणांचा निपटारा

२०२० ते २०२६ पर्यंत प्रलंबित २३१ प्रकरणांपैकी १४६ प्रकरणे निकाली; नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष अभियान

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रलंबित कायदेशीर प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातंर्गत अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली जात आहे. पंधरा दिवसांच्या विशेष मोहिमेत 146 प्रकरणांची निर्गती करण्यात आली.

अनेक कारणांमुळे पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूच्या नोंदींचा तपास प्रलंबित राहतो. मृतांच्या नातेवाईकांना वेळेत न्याय मिळावा, विमा दावे किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया सुलभ व्हाव्यात आणि शासकीय दप्तरांवरील कामाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या 15 दिवसांत सर्व पोलिस ठाण्यांमधील प्रलंबित अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेऊन चौकशी गतिमान करण्यात आली. प्रलंबित असलेले शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक लॅबचे अहवाल संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने प्राप्त करण्यात आले.

अनेक प्रकरणांमध्ये मृतांच्या वारसांना आणि नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सन 2020 ते 2026 साली 231 प्रकरणे शिल्लक होती. त्यापैकी 146 प्रकरणांची निर्गती करण्यात आली आहे. जुनी व प्रलंबित अकस्मात मृत्यूची प्रकरणे कायदेशीर चौकशीअंती अंतिम निकालात काढण्यात आली आहेत.

अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांचा तपास वेळेत पूर्ण होणे हे पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या मोहिमेमुळे प्रलंबित कामांचा ताण कमी झाला असून पारदर्शकता वाढली आहे. नागरिकांनी किंवा नातेवाईकांनी अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी -सुजित कुमार शिरसागर यांच्या देखरेखेखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT