श्रीगोंदा: सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा 51 वा गळीत हंगाम चालू असून, आज अखेर कारखान्याचे 4 लाख 72 हजार 340 मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. सरासरी प्रतिदिन 6500 मेट्रिक .टन उसाचे गाळप होत आहे. कारखान्याचा गाळप हंगाम 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात उच्चांकी 3 हजार 150 रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस दर जाहीर केला आहे. त्यापैकी पहिला हप्ता रुपये 3000 रुपये आतापर्यंत अदा करण्यात आला आहे. नागवडे कारखाना ऊसभावाबाबत कायम अग्रेसर राहिला आहे. सतत सभासद शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नागवडे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी सातत्याने सभासद शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा घेऊन त्यांच्या नंतरही कारखान्यामार्फत सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला आहे.
सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करून नागवडे कारखाना प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. नागवडे कारखाना ही तालुक्याची सहकार गंगोत्री असून, विकासाची मूळ मातृसंस्था आहे.
आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये सभासद शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले आहे आणि भविष्यातही निश्चितपणे करतील, याचा विश्वास आहे. जेवढे जास्त गाळप होईल, तेवढा संस्थेचा व सभासद शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यामुळे किमान 10 फेब्रुवारीपर्यंत सभासद शेतकऱ्यांनी थांबून आपला ऊस आपल्या कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नागवडे यांनी केले.